क्रिकेटचे नियम ठरवण्याची जबाबदारी मॅरिलेबॉन क्रिकेट क्लब अर्थात एमसीसीकडे आहे. हा खेळ आणखी चुरसीचा तसेच पारदर्शी व्हावा म्हणून एमसीसीकडून वेगवेगळे नियम तयार केले जातात. सध्या एमसीसीने क्रिकेटच्या नियमात काही बदल केले आहेत. हे बदल येत्या १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. क्रिकेटमध्ये आता चेंडूला लाळ लावण्यास बंदी, तसेच मंकडिंगचा रनआऊटमध्ये समावेश असे अनेक नवे नियम आले आहेत.
>>> नव्या नियमानुसार आता कोणताही फलंदाज झेलबाद झाला, तर नव्या खेळाडूला फलंदाजीसाठी (स्ट्रायकर) उतरावे लागेल. झेलबाद होताना फलंदाज एकमेकांची जागा घेत असतात. जागाबदल झाला तर नवा खेळाडू नॉन स्ट्राईकर म्हणून धावपट्टीवर उतरत असे. मात्र आता नव्या फलंदाजाला स्ट्राईकर म्हणूनच खेळपट्टीवर उतरावे लागेल.
>>> चेंडू टाकल्यानंतर मैदानावर एखादा व्यक्ती किंवा प्राणी आला तर डेडबॉल घोषित केला जाईल. याआधी असा अडथळा आला तरी खेळ सुरुच ठेवला जायचा.
>>> एखादा खेळाडू चुकीच्या पद्धतीने उभा राहिल्यास किंवा त्याने चुकीची हालचाल केल्यास त्यादम्यानचा चेंडू डेडबॉल घोषित केला जायचा. मात्र आता खेळाडूकडून अशा प्रकारची चूक झाल्यास फलंदाजी करणाऱ्या संघाला ५ गुण आगावीचे दिले जातील. याआधी डेड बॉल घोषित केल्यानंतर त्या चेंडूदरम्यान फलंदाजी करणाऱ्या टीमने केलेल्या धावा गृहीत धरल्या जात नव्हत्या. त्यामळे फलंदाजी करणाऱ्या टीमला याचे नुकसान व्हायचे.
>>> कोरोनामुळे चेंडूला लाळ लावण्यास मनाई करण्यात आली होती. आता मात्र चेंडूला लाळ लावण्यास कायस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे. त्याऐवजी चेंडू गुळगुळीत करण्यासाठी घाम लावता येईल.
>>> कोणताही चेंडू खेळपट्टीच्या बाहेर जाताना फटका मारताना फलंजाचा किंवा बॅटचा भाग खेळपट्टीत राहणे गरजेचे आहे. तसे नाही झाले तर बॉल डेड म्हणून घोषित करण्यात येईल. तसेच कोणताही चेंडू खेळण्यासाठी फलंदाजाला खेळपट्टीच्या बाहेर जावे लागत असेल तर तोदेखील डेड बॉल म्हणून घोषित केला जाईल.
>>> एखादा चेंडू खेळताना फलंदाजाने आपली जागा तसेच स्थिती बदलली तर फलंदाजाच्या जागेनुसारच तो चेंडू वाईड आहे की नाही हे ठरवले जाईल. स्टंप्सपासूनच्या लांबीनुसार चेंडू वाईड ठरवला जाणार नाही.
>>> क्रिकेटमध्ये मंकडिंगला अनफेअर प्लेचा दर्जा होता. चेंडू टाकताना नॉनस्ट्राईकर फलंदाज क्रीजमधून बाहेर पडत असेल आणि गोलंदाजाने बॉलने स्टंप्स उडवले तर त्याला मंकडिंग म्हटले जायचे. आता अशा पद्धतीने गोलंदाजाने नॉनन्स्ट्राईकर फलंदाजाला बाद केले तर त्याला अधिकृतरित्या धावचित समजले जाईल.