साहा, इशांतलाही डच्चू; श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांसाठी संघ जाहीर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसोटी कर्णधारपदही रोहितकडे

पीटीआय

अपेक्षित कामगिरी करण्यात सातत्याने अपयशी ठरणाऱ्या अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा आणि इशांत शर्मा या अनुभवी खेळाडूंना भारताच्या कसोटी संघातून वगळले आहे. श्रीलंकेविरुद्ध ४ मार्चपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी शनिवारी भारतीय संघाची घोषणा करतानाच मर्यादित षटकांच्या दोन्ही प्रकारांचा कर्णधार रोहित शर्माकडेच कसोटी संघाचेही नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

३७ वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाज साहा आणि १०० हून अधिक सामन्यांत खेळलेल्या वेगवान गोलंदाज इशांतला कसोटी संघात स्थान नसेल, हे संकेत आधीच निवड समितीने दिले होते. पुजारा आणि रहाणेच्या निवडीचीही अंधूक शक्यता वर्तवण्यात आली होती. संक्रमणाचे धोरण आखत निवड समितीने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी नवी संघबांधणी केली आहे. ‘‘रोहित हा कसोटी कर्णधारपदासाठी एकमेव पर्याय होता. जुन्या आणि नव्या खेळाडूंची एकत्रित मोट बांधण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्यामुळे रोहितकडे तिन्ही प्रकारांचे नेतृत्व आता असेल. याशिवाय केएल राहुल, जसप्रीत बुमरा आणि ऋषभ पंत या तिघांना कर्णधारपदाचे पर्याय म्हणून विकसित केले जाणार आहे,’’ असे निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. उत्तर प्रदेशचा डावखुरा फिरकी गोलंदाज सौरभ कुमार हा १८ सदस्यीय भारतीय संघातील एकमेव नवा चेहरा आहे. फलंदाज केएल राहुल, फिरकी गोलंदाज वॉिशग्टन सुंदर आणि अष्टपैलू शार्दूल ठाकूरला श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही मालिकांसाठी विश्रांती दिली आहे. राहुल आणि सुंदर हे दोघे दुखापतींवर उपचार घेत आहेत. ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनला संघात स्थान देण्यात आले असले तरी त्याला स्वत:ची तंदुरुस्ती सिद्ध करावी लागणार आहे. फिरकी गोलंदाज अक्षर पटेल अद्याप दुखापतीतून सावरला नाही. दुसऱ्या कसोटीसाठी तो उपलब्ध असेल, अशी आशा निवड समितीने व्यक्त केली आहे.

आफ्रिकेत चौकडीला पूर्वनिर्देश

रहाणे, पुजारा, साहा आणि इशांत यांना दक्षिण आफ्रिकेतच श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी वगळण्यात येणार असल्याचे निर्देश देण्यात आले होते, अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी दिली. २०२२ मधील कसोटी वेळापत्रकाचा आढावा घेतल्यास या चौघांच्या पुनरागमनाची शक्यता धूसर मानली जात आहे. भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळल्यानंतर इंग्लंडविरुद्ध एक आणि बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर २०२४ मध्ये भारतात ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी रहाणे आणि पुजाराला पुनरागमनाची आशा धरता येईल.

निवड समितीने रहाणे आणि पुजाराबाबत बरीच चर्चा केली; परंतु श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी आम्ही तुमचा विचार करणार नाही, हे दोघांना स्पष्टपणे सांगितले. पण तरीही भारतीय संघाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले आहेत. रणजी करंडक स्पर्धेत खेळून स्वत:ला सिद्ध करण्याचे आवाहन आम्ही त्यांना केले आहे.

– चेतन शर्मा, राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष

भारताचा कसोटी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), मयांक अगरवाल, प्रियांक पांचाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन (तंदुरुस्तीआधारे), रवींद्र जडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार.

ट्वेन्टी-२० मालिकेसाठी विराट, पंतला विश्रांती

श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आणि यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या अखेरच्या सामन्यासाठीही या दोघांना विश्रांती दिल्याने शनिवारीच ते जैव-सुरक्षित परिघातून घरी परतले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विराट आणि पंत या दोघांना १० दिवसांची विश्रांती दिली असून, ते एकंदर चार ट्वेन्टी-२० सामन्यांत उपलब्ध नसतील. कोलकाता येथे शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात दोघांनी अर्धशतके झळकावली होती. त्यामुळे भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतली. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये नियमित खेळणाऱ्या खेळाडूंना अधूनमधून विश्रांती  देऊन जैव-सुरक्षित परिघातील खेळाचा ताण आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी हे धोरण स्वीकारले आहे, असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले. पंतच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनचे ट्वेन्टी-२० संघात पुनरागमन झाले आहे.

ट्वेन्टी-२० संघ  

रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमरा (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, यजुर्वेद्र चहल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, आवेश खान.