ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट दक्षिण आफ्रिका संघटनेची ‘बीसीसीआय’ला हमी

दक्षिण आफ्रिकेत करोनाचा नवा उत्परिवर्तित विषाणू ओमायक्रॉनचा धोका वाढल्यास भारतीय संघाला आपला दौरा मध्यात सोडवा लागू शकेल. त्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए) संघटनेकडून हमी घेतल्याची माहिती त्यांचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. शुएब मांजरा यांनी दिली.

‘‘आफ्रिकेतील ओमायक्रॉनची स्थिती बिघडली आणि सीमाबंदी करण्याचा निर्णय झाल्यास दक्षिण आफ्रिका सरकारने भारतीय संघाला त्वरित मायदेशी परत पाठण्याची हमी दिली आहे,’’ असे मांजरा म्हणाले. तसेच पाहुणा संघ दक्षिण आफ्रिकेत पूर्णपणे सुरक्षित राहावा यासाठी योग्य खबरदारी घेतली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘‘भारतीय संघ आफ्रिकेत सुरक्षित राहावा यासाठी योग्य ती खबरदारी घेतानाच त्यांना कोणत्याही कारणास्तव मायदेशी परतायचे असल्यास आवश्यक ती व्यवस्था करून देण्यास आम्ही सज्ज आहोत. त्यांना कोणताही त्रास जाणवणार नाही. भारतीय खेळाडूंना उपचारांची गरज भासल्यास त्याचीही सोय करण्यात येईल. आम्ही काही रुग्णालय समूहांशी संवाद साधलेला असून त्यांनी आम्हाला खाटा उपलब्ध करून देण्याची हमी दिली आहे,’’ असे मांजरा यांनी सांगितले.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आधी १७ डिसेंबरपासून खेळवला जाणार होता. मात्र, आफ्रिकेतील ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा दौरा नऊ दिवस लांबणीवर पडला. भारतीय खेळाडूंनी आता सरावाला सुरुवात केली असली तरी त्यांना विविध र्निबधांचे पालन करावे लागत आहे.

कसोटी क्रमवारीत कोहलीची सातव्या स्थानी घसरण

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ताज्या कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत  भारताचा कर्णधार विराट कोहलीची सातव्या स्थानी घसरण झाली आहे. रोहित शर्माने क्रमवारीतील पाचवे स्थान कायम राखले आहे. ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लबूशेनने अ‍ॅशेसमधील सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर अग्रस्थान काबीज केले आहे.

खेळाडूला करोनाची बाधा झाली, तरी सामने होणार!

खेळाडू किंवा साहाय्यकांना करोनाची बाधा झाली, तरी सामने सुरू ठेवण्याबाबत ‘बीसीसीआय’ आणि ‘सीएसए’ यांचे एकमत झाले आहे. तसेच करोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या खेळाडूला विलगीकरणातही राहावे लागणार नसल्याचेही मांजरा यांनी सांगितले. ‘‘जैव-सुरक्षा परिघातील सर्वाचे लसीकरण झालेले असेल. त्यामुळे प्रकृती स्थिर असल्यास करोनाची बाधा झालेला खेळाडू किंवा साहाय्यक हॉटेलमधील आपल्या खोलीत विलगीकरणात राहू शकेल. करोनाबाधिताच्या संपर्कात आलेले खेळाडूही सामने खेळू शकतील. मात्र, या स्थितीत खेळाडूंची दररोज चाचणी होईल,’’ असे मांजरा यांनी नमूद केले.