राजस्थानातील एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेतील मोठा वाद समोर आला आहे. ‘तालिबान’ नावाच्या संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला. तालिबान सध्या अफगाणिस्तान प्रकरणामुळे चर्चेत आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील भानियाना गावात ही स्पर्धा सुरू होती. या स्पर्धेत तालिबान नावाच्या संघाला चुकून समाविष्ट करण्यात आले आणि नंतर वगळण्यात आले, असे आयोजकांनी सांगितले.

आयोजक गटाच्या सदस्याने टाईम्स नाऊला सांगितले, ”वादग्रस्त नाव असलेल्या संघाला पहिल्या सामन्यानंतर स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले. संघावर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. तालिबान नावाच्या संघाचा चुकून ऑनलाइन स्कोअरिंगमुळे समावेश करण्यात आला. आयोजकांच्या वतीने आम्ही माफी मागितली आणि भविष्यात पुन्हा अशी चूक होणार नाही, हेसुद्धा सांगितले.”

तालिबानचा अफगाणिस्तान क्रिकेटला पाठिंबा

तालिबानने अफगाणिस्तान क्रिकेटला पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे. काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या सदस्यांना भेटल्यानंतर तालिबानी नेता अनस हक्कानीने हे वक्तव्य केले होते. या बैठकीला कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी, क्रिकेट बोर्ड निवड समितीचे माजी अध्यक्ष असदुल्लाह आणि नूर अली झाद्रान उपस्थित होते. संभाषणादरम्यान हक्कानीने आश्वासन दिले, की अफगाणिस्तानमधील क्रिकेटपटूंना येणाऱ्या समस्यांचे विश्लेषण केले जाईल. याआधी तालिबानच्या सदस्यांनी असगर स्टानिकझाई आणि माजी कर्णधार नवरोज मंगल यांची भेट घेतली होती.

हेही वाचा – ENG vs IND : तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी बुमराह आणि पंतला मिळाली निराशादायक बातमी!

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर देशातील दिग्गज क्रिकेटपटूंनी चिंता व्यक्त केली आहे. स्टार खेळाडू राशिद खानने ट्विटरवर मदतीची मागणी केली होती. याशिवाय द हंड्रेड स्पर्धेत त्याने चेहऱ्यावर अफगाणिस्तानचा झेंडा रंगवून आपली देशभक्ती दाखवली. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका होणार होती, जी २०२३पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यंदाच्या टी -२० विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानच्या सहभागावर संकटाचे ढग दाटले आहेत.