सचिन तेंडुलकर एक अद्भुत व्यक्तिमत्त्व आहे. एक क्रिकेटपटू तसेच क्रीडापटू म्हणून त्याने दिलेले योगदान कुठल्याही मापदंडाच्या पलीकडे आहे. सलग २३ वर्षे अव्याहतपणे देशाची सेवा करणाऱ्या या अवलियाकडून आपण दररोज काहीतरी शिकण्यासारखे आहे. आता खेळतानाही त्याची ऊर्जा आणि खेळाप्रतीची निष्ठा आमच्यासारख्या तरुणांना थक्क करणारी आहे.
समस्या, प्रश्न, अडचणी यांचे अवडंबर न माजवता ध्येयाच्या दिशेने कशी वाटचाल करावी, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सचिन. जेव्हा मी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली, त्या वेळी सचिन विक्रमांची शिखरे सर करीत होता. त्याच्या प्रत्येक विक्रमाची मी नोंद ठेवीत असे. त्याचा खेळ पाहण्यासाठी मी आतूर असे. कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर मी सातत्याने चांगले प्रदर्शन केले. यामुळे लोक मला ‘बॅडमिंटनमधील सचिन तेंडुलकर’ म्हणत. एवढय़ा दिग्गज व्यक्तीच्या नावाने आपली स्तुती व्हायची, तेव्हा प्रचंड आनंद होत असे. मात्र त्याच वेळी आणखी चांगले प्रदर्शन सातत्याने करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे याची जाणीव व्हायची. क्रिकेटविश्वातील बहुतांशी विक्रम सचिनच्या नावावर आहेत. अशक्य वाटावी अशी त्याची कारकीर्द विस्तारली आहे. क्रिकेटविश्वातला एक खेळाडू याऐवजी क्रिकेटचे विद्यापीठ असा त्याचा उल्लेख समर्पक ठरेल.
सचिन ज्या क्रीडा क्षेत्राचा भाग आहे, त्याचा आपणही छोटा भाग आहोत ही भावना सुखावणारी आहे. मात्र इतक्या वर्षांत त्याची ‘याचि देहा, याचि डोळा’ भेट घेता आली नव्हती. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर हा योग भारतात जुळून आला. सचिनच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला. आलिशान गाडीच्या बक्षिसापेक्षाही एवढय़ा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाकडून होणारे कौतुक मला अधिक भावले. ‘सगळ्या देशवासीयांना अभिमानास्पद अशी कामगिरी तू केली आहेस. यापुढेही सातत्याने चांगले प्रदर्शन कर’, हे सचिनचे उद्गार प्रोत्साहन देणारे होते. या भेटीत मला सचिन माणूस म्हणून किती मोठा आहे याचा प्रत्यय आला. त्याच्या वागण्यातील साधेपणा, विनम्रता पाहून आपण आश्चर्यचकित होतो.
आपल्या खेळावर लक्ष एकाग्र कसे करावे, हे मी सचिनकडूनच शिकले आहे. प्रचंड मेहनत, अथक सराव, शिस्त तसेच प्रशिक्षक आणि वरिष्ठांप्रति आदर या सगळ्या गोष्टी सचिनला पाहूनच मी आत्मसात केल्या आहेत. सर्वोत्तम प्रदर्शन करण्याची तुमची तयारी असेल तर कोणतीही गोष्ट शक्य होऊ शकते हा विश्वास सचिनने दिला आहे. अब्जावधी देशवासीयांच्या आशा-अपेक्षांचे ओझे डोक्यावर असतानाही त्याने खेळातील सातत्य आणि वागण्यातला समतोल जपला आहे. अन्य खेळाडू विविध वादांमध्ये अडकत असताना सचिनने आपले वेगळेपण जपले आहे.
सचिन कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. क्रिकेटला अलविदा केल्यानंतर खासदार म्हणून तो देशात क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी कार्य करील अशी खात्री आहे. आगामी इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये सचिन एका संघाचे मालकत्व स्वीकारणार असल्याची चर्चा मी ऐकली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार प्रदर्शन करीत आहेत. अशा वेळी सचिनने बॅडमिंटनला पाठिंबा दिल्यास खेळाचा प्रसार आणि प्रचार याला मोठी गती मिळेल. ४०व्या वाढदिवसानिमित्त सचिनला मन:पूर्वक शुभेच्छा!
(शब्दांकन : पराग फाटक)सचिन मला आई म्हणूनच हाक मारतो. त्याने पहिल्यांदा मला आई म्हणून हाक मारली, तो दिवस मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. माझ्या मुलाच्या यशासाठी मी नेहमीच देवाकडे प्रार्थना करत असते.
– लता मंगेशकर, महान गायिका
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा