आस्ताद काळे

क्रिकेट हा खेळ आईकडून माझ्याकडे आला. कारण माझ्या आजोळी सर्व जण क्रिकेटचे चाहते आणि उत्तम खेळाडू आहेत. शाळा-महाविद्यालयांमध्ये खूप क्रिकेट खेळलो, परंतु पुढे गायन, अभिनयाकडे लक्ष दिल्याने क्रिकेट काहीसे मागे राहिले; पण क्रिकेटचे वेड मात्र कमी झाले नाही. ‘पुढचं पाऊल’ ही मालिका सुरू असताना सेलिब्रिटी क्रिकेट लीगचा भाग होतो. आता वेळ मिळेल तसे क्रिकेटचे सामने पाहत असतो. अगदी विश्वचषकच नाही तर कसोटी सामनेही पाहत असतो. भारतीय संघ गोलंदाजीमध्ये कमकुवत असल्याची टीका नेहमीच होत असते; पण यंदाच्या विश्वचषकात गोलंदाजांनी टीकाकारांना सणसणीत चपराक दिली आहे. प्रत्येक खेळाडू आपल्यातील वेगळेपण सिद्ध करत आहे. विशेष म्हणजे भावनिकता बाजूला सारून प्रत्येक खेळाडू तांत्रिकदृष्टय़ा अभ्यासपूर्ण खेळी साकारत आहे. सचिन तेंडुलकर सरांचा शेवटचा विश्वचषक सर्वाच्या लक्षात राहील. आता कारकीर्दीतील अखेरच्या विश्वचषकात खेळणाऱ्या धोनीला पुन्हा एकदा विश्वविजयाची भेट देऊन भारतीय संघ ही स्पर्धा संस्मरणीय करेल, यात शंका नाही.

(शब्दांकन : नीलेश अडसूळ)

Story img Loader