२०१९ विश्वचषक स्पर्धेत आश्वासक सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला चांगलाच धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात शतक झळकावणारा शिखर धवन हा अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. बीसीसीआयने धवनच्या जागेसाठी अधिकृतपणे कोणत्याही पर्यायाची निवड केलेली नाहीये. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतला संघात जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र भारतीय क्रिकेट संघाला पहिल्यांदा विश्वचषक जिंकवून देणाऱ्या कपिल देव यांनी शिखर धवनच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी देण्याची मागणी केली आहे.

“शिखर धवनच्या जागेवर पर्यायांचा विचार होत असेल, तर अजिंक्य रहाणेच्या नावाचा विचार होण्यास काहीच हरकत नाहीये. पंत आणि रायुडूच्या तुलनेत अजिंक्यची संघात निवड व्हायला हवी. अजिंक्यकडे मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. तो सलामीला फलंदाजीला येऊ शकतो, तसेच त्याच्याकडे मधल्या फळीत फलंदाजी करण्याचाही अनुभव आहे.” कपिल देव एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.

अवश्य वाचा – World Cup 2019 : टीम इंडियाला मोठी ‘राहत’, गब्बरला आहे खेळण्याची आशा !

अजिंक्य रहाणेने १६ महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा वन-डे सामना खेळला होता. यानंतर त्याला वन-डे संघात स्थान मिळवता आलेलं नाही. मात्र यानंतर अजिंक्यने काऊंटी क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेऊन, हॅम्पशायर संघाकडून पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकावलं. त्यामुळे आगामी काळात शिखर धवनच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होते की नाही आणि भारतीय संघात कोणाला जागा मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – विराटचं स्थान ढासळलं, घसरला थेट शंभराव्या स्थानावर

Story img Loader