२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला पहिल्यांदाच तगडी लढत मिळाली आहे. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर अंकुश लावत, २२४ धावांवर प्रतिस्पर्ध्याला रोखलं. भारताकडून विराट कोहली आणि केदार जाधव यांनी अर्धशतकी खेळीची नोंद केली. महेंद्रसिंह धोनीला मात्र आजच्या सामन्यात त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही.
धोनीने ५२ चेंडू खर्च करत केवळ २८ धावा केल्या. त्याच्या या खेळीत केवळ ३ चौकारांचा समावेश होता. राशिद खानच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या नादात धोनी यष्टीचीत होऊन माघारी परतला. आपल्या कारकिर्दीत यष्टीचीत होण्याची धोनीची ही दुसरी वेळ ठरली. २०११ साली वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यात देवेंद्र बिशुच्या गोलंदाजीवर धोनी पहिल्यांदा यष्टीचीत झाला होता. याचसोबत विश्वचषक इतिहासातली धोनीही ही धीमी खेळी ठरली.