२०१९ विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपदासाठीचे दोन दावेदार आता निश्चीत झाले आहेत. न्यूझीलंडने भारतावर मात करुन तर यजमान इंग्लंडने गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. विश्वचषक स्पर्धा म्हटली की अनेक विक्रम रचले जातात तर अनेक विक्रम मोडले जातात. मात्र भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावे असलेला विक्रम यंदाच्या स्पर्धेत अजुनही अबाधित आहे.

२००३ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सचिनने धडाकेबाज फलंदाजी करत स्पर्धेत ६७३ धावा पटकावल्या होत्या. विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा काढण्याचा हा विक्रम सचिनच्या नावे जमा झाला आहे. यंदाच्या स्पर्धेत रोहित शर्मा, शाकीब अल हसन, डेव्हिड वॉर्नर, जो रुट, केन विल्यमसन यांच्यासारख्या फलंदाजांनी धुँवाधार फलंदाजी करत सचिनच्या विक्रमला चांगलं आव्हान दिलं होतं. दरम्यान रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, शाकीब अल हसन यांचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. त्यामुळे हे फलंदाज आता सचिनचा विक्रम मोडू शकणार नाहीत.

मात्र इंग्लंडचा जो रुट आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनकडे सचिनचा हा विक्रम मोडण्याची एक अखेरची संधी असणार आहे. जो रुटच्या नावावर यंदाच्या स्पर्धेत ५४९ तर विल्यमसनच्या नावावर ५४८ धावा जमा आहेत. दोन्ही फलंदाजांना सचिनचा हा विक्रम मोडण्यासाठी अंतिम सामन्यात अनुक्रमे १२५ आणि १२४ धावा कराव्या लागणार आहेत. मात्र दोन्ही फलंदाज अशी कामगिरी करण्यात अयशस्वी ठरले तर सचिनचा विश्वचषक इतिहासातला विक्रम अबाधित राहिल. त्यामुळे रविवारी लॉर्ड्सच्या मैदानावर सचिनचा विक्रम कोणता फलंदाज मोडतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader