भारतीय संघाचं २०१९ विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. या पराभवानंतर आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळे यांनी, भारतीय संघाच्या पराभवाचं कारण निवड समितीवर फोडलं आहे. विश्वचषकासाठी निवड समितीने चुकीचा संघ निवडला असा आरोप, जगदाळे यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
“भारतीय संघाची मधली फळी, दबावाखाली खेळण्यासाठी योग्य नव्हती हे माझं मत कायम आहे. माझ्या दृष्टीने चौथ्या क्रमांकासाठी अजिंक्य रहाणे योग्य उमेदवार होता. २००३ पासून क्रिकेट खेळत असलेले खेळाडू जे संघात आपली जागा कायम राखू शकले नाहीत, त्यांना तुम्ही संघात स्थान कसं देता? हे खेळाडू संघाचं भविष्य नाहीयेत. रहाणेने पहिल्या इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी केली होती. अजिंक्यची बाहेरच्या मैदानावरची कामगिरी चांगली होती. विराट आणि चेतेश्वर पुजाराचा अपवाद वगळता फलंदाजीत चांगली फार कमी फलंदाजांनी केली आहे. मग रहाणेसारख्या अनुभवी खेळाडूला संघात स्थान का मिळालं नाही. त्याच्याकडे अडचणीच्या काळात संघाला स्थैर्य मिळवून देण्याचं कौशल्य आहे.” जगदाळे एक्स्प्रेस वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
अवश्य वाचा – World Cup 2019 : चौथ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज नसणं आम्हाला भोवलं – रवी शास्त्री
याचसोबत ऋषभ पंतला सुरुवातीपासून भारतीय संघात जागा न देण्याच्या निर्णयाबद्दलही जगदाळे यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऋषभने कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावलं आहे. आणि या कामगिरीनंतर तुम्ही वन-डे मालिकेत त्याला बसवता. विश्वचषकाआधी जास्तीत जास्त सामन्यांमध्ये ऋषभ पंतला संधी मिळायला हवी होती. जगदाळेंनी निवड समितीच्या निर्णयावर टीका केली. संजय जगदाळे यांनी याआधी भारताच्या २००३, २००७ आणि पहिल्या टी-२० विश्वचषक संघाची निवड केली होती.
अवश्य वाचा – संघातल्या तरुणांना धोनीच्या मार्गदर्शनाची गरज !