२०१९ विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने न्यूझीलंडवर सुपरओव्हरमध्ये मात करत, स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. निर्धारित वेळेत सामना अनिर्णित राहिल्यानंतर सुपरओव्हरमध्येही सामना बरोबरीत सुटला. अखेरीस सर्वाधिक चौकारांच्या निकषावर सामन्यात इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं होतं. इंग्लंडच्या बेन स्टोक्सने ८४ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
२४२ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला इंग्लंडचा संघ, न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ २४१ धावांपर्यंतच मजल मारु शकला. पहिले ४ गडी माघारी परतल्यानंतर बेन स्टोक्सने आक्रमक खेळी करत इंग्लंडच्या डावाला आकार दिला. स्टोक्सने ५ चौकार आणि २ षटकार लगावत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना चांगली झुंज दिली.
अखरेच्या षटकांमध्ये बेन स्टोक्सला माघारी धाडण्याची न्यूझीलंडला चांगली संधी चालून आली होती. मात्र सीमारेषेवर ट्रेंट बोल्टचा झेल पकडतानाचा अंदाज चुकला. नकळत तोल गेल्यामुळे झेल पकडताना बोल्टचा पाय सीमारेषेवर पडल्यामुळे स्टोक्सचा फटका षटकार घोषित करण्यात आला. बोल्टने स्टोक्सचा झेल व्यवस्थित पकडला असता तर कदाचीत सामन्याचा निकाल न्यूझीलंडच्या बाजूने लागू शकला असता.
A final decided by a thousand fine margins.#CWC19Final pic.twitter.com/RbHeil8gEr
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 14, 2019
दरम्यान इंग्लंडचं वन-डे विश्वचषक स्पर्धेचं हे पहिलं विजेतेपद ठरलं आहे. बेन स्टोक्सला त्याच्या धडाकेबाज खेळीसाठी सामनावीराचा किताब घोषित करण्यात आला. याआधी साखळी सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध, ट्रेंट बोल्टने अखेरच्या षटकांमध्ये सीमारेषेवर कार्लोस ब्रेथवेटचा झेल पकडत संघाला विजय मिळवून दिला होता. मात्र अंतिम सामन्यात ही किमया बोल्टला साधता आली नाही.