वर्ल्डकप विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारताचा पहिल्याच सराव सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव झाला. न्यूझीलंडने सहा गडी राखून आरामात भारतावर विजय मिळवला. भारताने दिलेले १८० धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने १३ षटके राखून पार केले. कर्णधार विलियमसन (६७) आणि टेलर (७१) यांच्या फलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने सहज विजय संपादन केला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली.

रविंद्र जाडेजाचा (५४) अपवाद वगळता भारताच्या अन्य फलंदाजांनी सपशेल निराशा केली. जाडेजाच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताला १७९ धावांचा टप्पा गाठता आला. अर्धशतकी खेळीत जाडेजाने सहा चौकार आणि दोन षटकार लगावले. कर्णधार विराट कोहलीसह सलमीवीर रोहित शर्मा, शिखर धवन आणि लोकेश राहुल स्वस्तात बाद झाले.

हार्दिक पांडयाने (३०) थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. एम एस धोनी (१७) आणि दिनेश कार्तिक (४) फारशी चमक दाखवू शकले नाहीत. पांडया आणि कार्तिकला नीशामने तर धोनीला साऊदीने बाद केले. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बाऊल्टने भेदक मारा करत रोहित (२), शिखर (२) आणि राहुलला (६) स्वस्तात बाद केले.

कर्णधार कोहली ग्रँडहोमीचा बळी ठरला. कोहलीने अवघ्या १८ धावा केल्या. भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. आजच्या सामन्यात केदार जाधव आणि विजय शंकर खेळले नाहीत. ३० मे पासून इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धा सुरु होत आहे.