विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना, जेसन होल्डरचा विंडिज संघ चांगलाच फॉर्मात आलेला आहे. न्यूझीलंडविरुद्ध सराव सामन्यात विंडिजच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत ४०० धावांचा टप्पा ओलांडला. पहिल्यांदा फलंदाजी करताना शाई होपचं शतक आणि एविन लुईस आणि आंद्रे रसेल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर विंडीजने ४२१ धावांचा पल्ला गाठला. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडचा संघ ३३० धावांपर्यंतच मजल मारु शकला. ९१ धावांनी सामन्यात विजय मिळवत विंडीजने आपले इरादे स्पष्ट केले आहेत.

अवश्य वाचा – दुसऱ्या सराव सामन्यात भारत विजयी, धोनी-लोकेश राहुलची शतकी खेळी

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा हा निर्णय चुकला, सलामीवीर ख्रिस गेल आणि एविन लुईस यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. ट्रेंट बोल्टने ख्रिस गेलला माघारी धाडल्यानंतर शाई होपने मैदानात येऊन संघाची बाजू सांभाळली. एविन लुईस अर्धशतक झळकावून माघारी परतल्यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी काहीशी निराशा केली. मात्र कर्णधार जेसन होल्डर आणि आंद्रे रसेल यांनी फटकेबाजी करत संघाला ४०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. होपने यादरम्यान आपलं शतकही साजरं केलं. होल्डरने ४७ तर रसेलने ५४ धावा केल्या. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने ४ तर मॅट हेन्रीने २ बळी घेतले. त्यांना मिचेल सँटनरने एक बळी घेत चांगली साथ दिली.

अवश्य वाचा – Video : मराठमोळा केदार जाधव झळकणार Race 4 चित्रपटात, रोहित शर्माने दिले संकेत

प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडच्या संघाची सुरुवात अडखळती झाली.मार्टिन गप्टील अवघ्या ५ धावा काढून माघारी परतला. ठराविक अंतराने हेन्री निकोलसही केमार रोचच्या गोलंदाजीवर माघारी परतला. रॉस टेलरही ठराविक अंतराने माघारी परतल्यामुळे न्यूझीलंडचा डाव संकटात सापडला. यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि टॉम ब्लंडेल यांनी न्यूझीलंडचा डाव सावरला. ब्लंडेलने १०६ तर विल्यमसनने ८५ धावांची खेळी केली. मात्र ही जोडी फुटल्यानंतर न्यूझीलंडचा डाव पुन्हा गडगडला. अखेरीस ३३० धावांत न्यूझीलंडच्या संघाला गुंडाळून विंडीजने ९१ धावांनी विजय संपादन केला. विंडिजकडून कार्लोस ब्रेथवेटने ३, फॅबिन अॅलेनने २ बळी घेतले.

अवश्य वाचा – निवृत्तीचा निर्णय धोनी योग्यवेळी घेईल – शेन वॉर्न