पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम तसंच माजी क्रिकेटपटू मिसबाह-उल-हक आणि शोएब मलिक या तिघांनीही के.एल. राहुलच्या शतकाचं कौतुक केलं आहे. के. एल. राहुलने नेदरलँड्स विरोधात खेळताना ६२ चेंडूंमध्ये १०० धावा केल्या. त्याच्या या खेळीचं वसीम अक्रमने खास शब्दात कौतुक केलं आहे. एकवेळ ग्लेन मॅक्सवेलविरोधात गोलंदाजी करणं सोपं आहे पण के.एल. राहुलच्या विरोधात नाही असं अक्रम म्हणाला.
काय म्हणाला वसीम अक्रम?
“ग्लेन मॅक्सवेलच्या विरोधात गोलंदाजी करणं एकवेळ सोपं आहे पण के. एल. राहुलच्या विरोधात नाही. कारण त्याला कुठल्याही गोलंदाजीचा सामना कसा करायचा? याचं टेक्निक समजलं आहे. एकदिवसीय सामने, टी २० क्रिकेट यामध्ये त्याने याचा उत्तम सराव केला आहे. त्याची कामगिरी ही बेस्ट असते हे त्याने दाखवून दिलं आहे. ”
हे पण वाचा- बहोत हार्ड! वसीम अक्रम म्हणतो, “पाकिस्तानला सेमी फायनल गाठायची असल्यास इंग्लंड टीमला ड्रेसिंग रुममध्ये…”
के. एल. राहुल किल्ला लढवू शकतो
के. एल. राहुलचं कौतुक करताना शोएब मलिक म्हणाला, “राहुल हा एक उत्तम फलंदाज आहे. तरीही भारतीय संघाने त्याला चौथ्या क्रमांकावर बॅटिंग देण्याचा पर्याय ठेवला आहे. कारण त्याला टेक्निक कळलं आहे. समजा भारतीय संघाच्या विकेट्स लवकर गेल्या तर चौथ्या क्रमांकावर येऊन के.एल. राहुल हा किल्ला लढवू शकतो. उत्तम खेळी करु शकतो याचसाठी त्याला हे स्थान दिलं गेलं आहे. ” असं म्हणत मलिकने त्याचं कौतुक केलं आहे.
के. एल. राहुलचं वैशिष्ट्य हे आहे की तो उत्तम खेळी करुन सामना जिंकवून देऊ शकतो. त्याच्यासमोर फिरकीपटू आले काय किंवा जलद गतीने गोलंदाजी करणारे गोलंदाज आले काय प्रत्येक चेंडूचा सामना उत्तम प्रकारे कसा करायचा हे तो त्याच्या सरावाने शिकला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात त्याने सामना कसा जिंकवून दिला हे आम्ही पाहिलं आहे असंही मलिक म्हणाला.
मिसबाह उल हकनेही केलं राहुलचं कौतुक
यानंतर मिसबाह उल हकनेही के. एल. राहुलच्या खेळीचं आपल्या खास शब्दात कौतुक केलं आहे. यॉर्कर चेंडू असो किंवा फिरकी चेंडू असो त्याचा सामना के. एल. राहुल ज्या शिताफीने करतो त्याला जवाब नाही. अशा फलंदाजांसमोर गोलंदाजी करणं हे कायमच आव्हानात्मक असतं. त्यामुळेच के. एल. राहुल सारख्या फलंदाजासमोर गोलंदाजी करणं कठीण होतं, असं म्हणत मिसबाह-उल-हकने त्याचं कौतुक केलं आहे.