नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा तडाखेबंद फलंदाज ख्रिस गेलला मागे टाकत भारताचा कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम आपल्या नावे केला. आपण इतके षटकार मारू शकू असे कारकीर्दीच्या सुरुवातीला वाटले नव्हते. मात्र, वर्षांनुवर्षे घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. तसेच षटकार मारण्यासाठी आपल्याला गेलकडूनच प्रेरणा मिळाल्याचे रोहित म्हणाला.
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी अफगाणिस्तान संघाविरुद्ध रोहितने अवघ्या ८१ चेंडूंत १३१ धावांची उत्कृष्ट खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम नोंदवताना गेलला मागे टाकले. गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५५३ षटकार (५५१ डावांत) मारले होते. रोहितचे ४७३ डावांत आता ५५६ षटकार झाले आहेत.
हेही वाचा >>> World Cup 2023 : गिलचा तासभर सराव; पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची शक्यता बळावली
‘‘युनिव्हर्स बॉसला (गेल) तोड नाही. मला त्याच्याकडूनच प्रेरणा मिळाली आहे. वर्षांनुवर्षे आपण त्याची फलंदाजी पाहत आहोत. षटकार मारण्यात त्याचा हातखंडा आहे. आम्ही दोघेही ४५ क्रमांक असलेली जर्सी परिधान करतो. त्यामुळे जर्सीवर हा क्रमांक असलेल्या खेळाडूने आपला विक्रम मोडला याचा गेलला आनंद असेल,’’ असे ‘बीसीसीआय’ने समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीत रोहित म्हणाला.
‘‘मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हा षटकार मारू शकेन असे मला अजिबातच वाटले नव्हते. इतके षटकार मारण्याचा तर मी कधी विचारही केला नव्हता. वर्षांनुवर्षे मी बरीच मेहनत घेतली आहे. त्याचे फळ मिळाल्याचा आनंद आहे. यश मिळाले म्हणून समाधान मानणाऱ्यांपैकी मी नाही. विक्रम नोंदवणे हा नक्कीच आनंदचा क्षण आहे. परंतु मी त्याबाबत फार विचार करणार नाही,’’ असे रोहितने स्पष्ट केले.
गेलकडून अभिनंदन
गेलने ‘एक्स’च्या (आधीचे ट्विटर) माध्यमातून रोहितचे अभिनंदन केले. ‘‘अभिनंदन रोहित. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार.
४५ हा क्रमांकच खास आहे,’’ असे गेलने ‘एक्स’वर लिहिले. गेलने रोहितसोबतचे छायाचित्रही पोस्ट केले. याबद्दल रोहितने गेलचे आभार मानले. ‘‘धन्यवाद सीजी (ख्रिस गेल). आपल्या जर्सीच्या मागे
४ आणि ५ हे क्रमांक असले, तरी ६ हा आपला सर्वात आवडता क्रमांक आहे,’’ असे रोहित गमतीत म्हणाला.
निराशा ते विक्रम..
अफगाणिस्तानविरुद्धच्या १३१ धावांच्या खेळीदरम्यान रोहितने एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक शतकांचा सचिन तेंडुलकरचा (६) विक्रम मोडीत काढला. रोहितचे हे सातवे शतक ठरले. या विक्रमानंतर रोहितच्या २०११ सालच्या एका ‘ट्वीट’ची समाजमाध्यमांवर बरीच चर्चा रंगली. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०११च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. मात्र, त्यावेळी रोहितला भारतीय संघातून डावलण्यात आले होते. त्यानंतर ‘‘विश्वचषकासाठीच्या संघाचा भाग नसल्याने खूप निराश आहे. मी आता पुढचा विचार करणे गरजेचे आहे. मात्र माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे,’’ असे ‘ट्वीट’ रोहितने केले होते. या धक्क्यातून सावरत रोहितने भारतीय संघात आपले अढळ स्थान निर्माण केले. त्याने २०१५च्या एकदिवसीय विश्वचषकात एक, २०१९च्या विश्वचषकात पाच, तर सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात एक शतक केले आहे.