India vs Australia ICC World Cup Final 2023: भारताने आयोजित केलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ने अनेक विक्रम केले. या विश्वचषकात भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करत अनेक विक्रम केले, मात्र अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. या स्पर्धेदरम्यान १२,५०,३०७ लोकांनी स्टेडियममध्ये जाऊन सामने पाहिले. आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत पहिल्यांदाच १२ लाखांहून अधिक प्रेक्षक सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचले, त्यामुळे प्रेक्षकांच्या संख्येत एक नवा विक्रम निर्माण झाला. एकदिवसीय विश्वचषक २०२३ ही आतापर्यंतची सर्वात लोकप्रिय आयसीसी स्पर्धा ठरली आहे.
सोशल मीडियावर पाहणाऱ्यांची संख्या देताना आयसीसीने असेही म्हटले आहे की, “आजपर्यंतच्या दर्शकांची ही सर्वात मोठी संख्या आहे. याबरोबरच आयसीसीने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. या स्पर्धेत एकूण ४८ सामने खेळले गेले आणि ४२व्या सामन्यातच मैदानावर पोहोचलेल्या आणि सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येने १० लाखांचा टप्पा ओलांडला. या स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होता, जो २०१९च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. या सामन्यात विश्वविक्रम झाला. आयसीसी विश्वचषकातील हा सर्वात जास्त पाहिला गेलेला पहिला सामना होता.
५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान खेळल्या गेलेल्या या विश्वचषकाच्या प्रत्येक सामन्यात चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ ऑक्टोबरला खेळला गेलेला सामना विश्वचषकातील सर्वाधिक पाहिला जाणारा सामना ठरला. यापूर्वी, एकदिवसीय विश्वचषक २०१५ ही आयसीसीची सर्वाधिक पाहिली जाणारी स्पर्धा होती. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये खेळली जाणारी ही स्पर्धा १०,१६,४२० लोकांनी स्टेडियममध्ये जाऊन पाहिली. त्याचवेळी २०१९चा विश्वचषक पाहण्यासाठी ७,५२,००० लोक स्टेडियममध्ये पोहोचले होते.
एकदिवसीय विश्वचषकाच्या १३व्या आवृत्तीत टीव्ही आणि डिजिटल दर्शकांचे सर्व रेकॉर्ड मोडले गेले. यावरून क्रिकेटची जागतिक लोकप्रियता दिसून येते. या विश्वचषकाबाबत, आयसीसी ‘हेड ऑफ इव्हेंट’ ख्रिस टेटली म्हणाले, “आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ ही एक प्रचंड यशस्वी ठरलेली स्पर्धा आहे, ज्याने खेळाचे सर्वोत्कृष्ट पैलू प्रदर्शित केले आहेत आणि जगभरातील लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. या स्पर्धेने सर्वांचेच मनोरंजन केले आहे. सामना पाहण्यासाठी झालेली गर्दी ही अविश्वसनीय अशा स्वरुपाची होती. एवढी प्रेक्षक संख्या पाहून आम्ही देखील आश्चर्यचकित झालो आहोत. हे क्रिकेटचे चिरस्थायी आकर्षण आणि एकदिवसीय फॉरमॅटसाठी चाहत्यांमध्ये असलेला उत्साह दर्शवते. ही एक अशी घटना आहे ज्याने केवळ मनोरंजनच केले नाही तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांना खेळात गुंतवून ठेवले. टीम इंडियाने या विश्वचषकाचा उत्सव केला.”
पुढे ते म्हणाले की, “आमच्या खेळाच्या वाढीसाठी तसेच, जगभरातील चाहत्यांच्या आणि खेळाडूंच्या पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी आयसीसीच्या या स्पर्धा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आम्ही सर्व चाहत्यांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ इतका उत्कृष्ट आणि यशस्वी कार्यक्रम बनवला. भविष्यातील आयसीसी स्पर्धां प्रत्येक चाह्त्यासाठी अधिक रोमांचक अनुभव देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”