ऋषिकेश बामणे – response.lokprabha@expressindia.com

भारतीय क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्यातून अनेक सकारात्मक बाबी समोर आल्या असल्या तरी आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने आणखी काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान संघ व्यवस्थापनापुढे कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक कसोटी व एकदिवसीय मालिका विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ दिमाखात न्यूझीलंडला दाखल झाला. गेले पाच-सहा महिने सतत क्रिकेट खेळत असल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कर्णधार विराट कोहलीला तीन एकदिवसीय सामन्यांनंतर विश्रांती देत उर्वरित दोन सामन्यांसह ट्वेन्टी-ट्वेन्टी मालिकेसाठी रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवले. त्याशिवाय प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमरालासुद्धा या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा भन्नाट फॉर्म भारतीय फलंदाजांनी येथेही कायम राखला. पहिल्या तीनही सामन्यात विजय मिळवून भारताने न्यूझीलंडच्या भूमीवरसुद्धा पहिल्यांदाच ऐतिहासिक अशा एकदिवसीय मालिका विजेतेपदाला गवसणी घातली. कोहली, रोहित किंवा धवन यांपकी एकालाही या मालिकेत शतक झळकावता आले नसले तरी भारतीय गोलंदाजांनी येथे संपूर्ण वर्चस्व गाजवले. युजवेंद्र चहल व कुलदीप यादव यांच्या फिरकी जोडीने किवी फलंदाजांना अक्षरश आपल्या तालावर नाचवले. तर बुमराच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमीने मिळालेल्या संधीचा फायदा उचलत मालिकावीराचा पुरस्कार पटकावला.

भारताच्या कामगिरीवर सखोल नजर टाकायची झाल्यास सलामीवीरांपासून सुरुवात करावी लागेल. रोहित-शिखरने पहिल्या तीन सामन्यांत धडाकेबाज खेळ करत ४१, १५४, ३९ अशी सलामी नोंदवली. मात्र अखेरच्या दोन्ही लढतीत दोघेही अपयशी ठरले. कोहलीनेसुद्धा संघाचा निरोप घेण्यापूर्वी दोन अर्धशतके झळकावत त्याचा सदाबहार फॉर्म पुन्हा दाखवून दिला. मात्र त्याच्या अनुपस्थितीत स्थान मिळालेल्या २० वर्षीय शुभमन गिलला छाप पाडता आली नाही. महेंद्रसिंह धोनीने मात्र यष्टिरक्षणात व फलंदाजीत अशा दोन्ही विभागांत त्याचा ‘मिडास टच’ कायम राखला. मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने दारुण पराभव पत्करला. अंबाती रायुडू तसंच ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे चर्चेत आलेला हार्दकि पंडय़ा यांच्या दमदार खेळीच्या बळावर भारताने पाचवा सामना जिंकून ४-१ अशी मालिका खिशात घातली. विश्वचषकाच्या दृष्टीने भारताने मिळवलेले हे यश आनंददायक असले तरी आणखी काही गोष्टींची पूर्तता होणे आवश्यक आहे.

विशेष म्हणजे इंग्लंडमधील खेळपट्टय़ा वेगवान गोलंदाजांसाठी पोषक असल्याने संघात दोन वेगवान गोलंदाज, दोन फिरकीपटू व एक अष्टपलू अशी गोलंदाजांची रचना करायची की नाही, याचे उत्तर अद्याप संघ व्यवस्थापनाला शोधायचे आहे. त्याशिवाय बुमराच्या पुनरागमनानंतर शमीचे संघातील स्थान पुन्हा एकदा अनिश्चितच मानले जाईल. किंवा कुलदीप व चहल यांच्यापकी एकाला संघाबाहेरचा रस्ता दाखवत भारत बुमरा, भुवनेश्वर व शमी अशा वेगवान त्रिकुटासह मदानात उतरू शकतो, त्याशिवाय पंडय़ाची साथ त्यांच्या मदतीला आहेच. जेथे चेंडू अतिरिक्त िस्वग होतो, अशा खेळपट्टय़ांवर कोहली तीन वेगवान व एका फिरकीपटूसहच खेळेल, अशीच शक्यता आहे.

चौथ्या क्रमांकावरील फलंदाज कोण हा प्रश्न जवळपास गेली दोन वष्रे भारताला भेडसावत होता. सुरेश रैना, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, धोनी, हार्दकि असे विविध पर्याय भारताने या क्रमांकावर तपासून पाहिले. मात्र वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेद्वारे अंबाती रायुडूने ही समस्या सोडवली आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. पहिल्या तीन क्रमांकाचे फलंदाज अपयशी ठरल्यास भारताची काय अवस्था होते, हे सर्वानी अनुभवले. त्यामुळे अशा परिस्थितीत रायुडूला डाव सावरण्याची कला अंगी जोपासणे अत्यावश्यक आहे व त्याने पाचव्या लढतीत हे करूनदेखील दाखवले. पाचव्या तसंच सातव्या क्रमांकावर अनुक्रमे धोनी व हार्दकि यांचे स्थान पक्के असून केदार जाधव व रवींद्र जडेजा यांचे संघातील स्थान खेळपट्टीवरच अवलंबून असेल, हे निश्चित.

एकंदरीत मालिका विजय मिळवला असला तरी विश्वचषकापूर्वी आणखी काही रिकाम्या जागा भरण्याचे आव्हान भारतीय संघापुढे कायम आहे. २४ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या मालिकेत या सर्व प्रश्नांची उत्तरे संघ व्यवस्थापनाला मिळतील व ३० मेपासून रंगणाऱ्या विश्वचषकासाठी संपूर्ण जोमाने आपण तयार होऊ, हीच अपेक्षा आहे.

महिलांनीही पुरुषांचा कित्ता गिरवला!

एकीकडे भारत व न्यूझीलंडचे पुरुष संघ एकमेकांशी दोन हात करत असताना उभय देशांचे महिला संघसुद्धा एकदिवसीय व ट्वेन्टी-ट्वेन्टी मालिकेत समोरासमोर उभे ठाकले होते. महिलांच्या एकंदर कामगिरीचा हा आढावा.

अनुभवी कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिलांनी सुरेख खेळ करत तीन लढतींच्या एकदिवसीय मालिकेत २-१ असे यश संपादन केले. महिला क्रिकेटमधील विराट कोहली म्हणून लोकप्रिय असलेल्या स्मृती मानधनाने तिच्या लौकिकाला साजेसे प्रदर्शन करत मालिकावीर पुरस्कार पटकावला. त्याशिवाय महिलांच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत स्मृतीने पहिल्यांदाच अव्वल स्थानी झेप घेत क्रीडा रसिकांचा आनंद द्विगुणित केला. वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी व मितालीचा कदाचीत हा कारकीर्दीतील अखेरचा न्यूझीलंड दौरा असू शकतो.

पूनम यादव, दीप्ती शर्मा व अनुजा पाटील या फिरकी त्रिकुटाने या मालिकेत निर्वविाद वर्चस्व गाजवले. तीन सामन्यात मिळून तिघींनी तब्बल २० बळी पटकावले. त्याशिवाय युवा जेमिमा रॉड्रिग्जनेही चांगली कामगिरी केली. मितालीने या मालिकेत सर्वाधिक २०० एकदिवसीय सामने खेळणारी पहिली महिला होण्याचा मान मिळवला. पुढील दोन आठवडय़ांत भारताला मायदेशात विश्वविजेत्या इंग्लंडचे कडवे आव्हान पेलावे लागणार असून उभय संघांमध्ये  एकदिवसीय व ट्वेन्टी-ट्वेन्टी मालिका रंगणार आहे.

हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली ट्वेन्टी-ट्वेन्टी मालिकेत मात्र महिला संघाने सपशेल शरणागती पत्करली. न्यूझीलंडने आपल्याला ३-० अशी धूळ चारल्याने दौऱ्याची सांगता विजयानिशी करता आली नाही. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-ट्वेन्टी विश्वचषकापूर्वी संघाचे कच्चे-पक्के दुवे कोणते, याची जाणीव संघाला झाली. विशेष म्हणजे मालिकेतील तीनपकी दोन सामन्यांत मितालीला वगळण्याच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा संघात काही बिनसले तर नाही ना, अशी शंका चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे.

ट्वेन्टी-ट्वेन्टी मालिकेत पदरी निराशा!

एकदिवसीय मालिकेत विजय मिळवल्यानंतर ट्वेन्टी-ट्वेन्टी मालिकेच्या विजेतेपदासह या प्रदीर्घ दौऱ्याची विजयी सांगता करण्याचे भारतीय संघाचे मनसुबे न्यूझीलंडने उधळून लावले. सांघिक कामगिरी व मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्यात अपयश आल्याने आपण ही मालिका २-१ अशी गमावली.
मात्र या मालिकेदरम्यान अनेक विक्रमदेखील रचले गेले. कर्णधार रोहितकरिता ही मालिका प्रामुख्याने लाभदायक ठरली. ट्वेन्टी-ट्वेन्टी प्रकारात सर्वाधिक धावा, सर्वाधिक अर्धशतके, सर्वाधिक षटकार खेचणाऱ्यांच्या यादीत दुसरे स्थान असे अनेक पराक्रम रोहितने आपल्या नावावर केले. त्याव्यतिरिक्त १० वर्षांत प्रथमच भारताला न्यूझीलंडमध्ये पहिला ट्वेन्टी-ट्वेन्टी सामना जिंकता आला, मात्र मालिका विजयाने त्यांना हुलकावणी दिली. भारताने या मालिकेसाठी कृणाल पंडय़ा, ऋषभ पंत यांसारख्या युवांना संधी दिली होती व त्या दोघांनीही या संधीचा बऱ्यापकी फायदा उचलला. ट्वेन्टी-ट्वेन्टी मालिकेतील एकमेव विजयाचा शिल्पकार (सामनावीर) कृणालच ठरला.
सौजन्य – लोकप्रभा