David Warner Retired : टी-२० विश्वचषक २०२४ या स्पर्धेत नुकत्याच झालेल्या अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्यात अफगाणिस्तानने विजय मिळवल्याने यंदाच्या टी-२० विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडला असून खेळाडू मायदेशी परतले आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. वॉर्नरने यापूर्वीच कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. आता त्याने टी-२० क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे. वॉर्नर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नसला तरी तो इंडियन प्रीमियर लीगसह (आयपीएल) इतर फ्रेंचायझी स्पर्धांमध्ये खेळत राहील. वॉर्नरने आंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४९ षतकांसह १८,९९५ धावा फटकावल्या आहेत.
वॉर्नरच्या निवृत्तीनंतर त्याचे सहकारी, जगभरातील क्रिकेटपटू, क्रिकेटरसिक आणि वॉर्नरचे चाहते त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. दरम्यान, वॉर्नरची पत्नी कँडिस वॉर्नर हिनेदेखील समाजमाध्यमांवर एक पोस्ट लिहून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. कँडिसने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, “डेव्हिड वॉर्नरने आपल्या देशासाठी सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द घडवल्याबद्दल त्याचं अभिनंदन. त्याच्यामुळे आम्हालाही पुढच्या रांगेत बसायला मिळणं हे आमचं सौभाग्य. आम्हाला आता तुला ऑस्ट्रेलियासाठी खेळताना पाहण्याची संधी मिळणार नाही. मात्र तू आता आमच्याबरोबर घरी असशील, तुला या भूमिकेत पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.”
कँडिसने म्हटलं आहे, कोणी विसरलं असेल तर मी काही तथ्य मांडतेय. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत १०० सामने खेळणारा वॉर्नर हा एकमेव ऑस्ट्रेलियन आणि जगातला तिसरा क्रिकेटपटू आहे. तिन्ही प्रकारांत मिळून ४९ आंतरराष्ट्रीय शतकं (रिकी पॉन्टिंगनंतर दुसऱ्या क्रमांकावर), सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतकं, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८,९९५ धावा (रिकी पॉन्टिंगनंतर दुसरा), दोन वेळा एकदिवसीय विश्वचषक विजेता, एकदा टी-२० विश्वचषक विजेता, विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू, एक जागतिक कसोटी अजिंक्यपद, तीन वेळा अॅलन बॉर्डर पदक विजेता, नाबाद ३३५ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
हे ही वाचा >> “विराट कोहली १५० किलोचे डंबेल उचलतो, पण रोहित शर्माचा एक पॅक..”, कपिल देव यांचं मोठं विधान; म्हणाले, “मर्यादांची..”
डेव्हिड वॉर्नरने १६१ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये ४५.३० च्या सरासरीने आणि ९७.२६ च्या स्ट्राईक रेटने ६,९३२ धावा जमवल्या आहेत. यादरम्यान त्याने २२ शतकं आणि ३३ अर्धशतकं झळकावली आहेत. वॉर्नरने जानेवारी २००९ मध्ये होबार्ट येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याद्वारे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा जमवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याचा सहावा क्रमांक लागतो. त्याचबरोबर त्याने १११ कसोटी सामन्यांच्या २०३ डावांमध्ये ४४.०६ च्या सरासरीने ८,६९५ धावा जमवल्या आहेत. यामध्ये २६ शतकं आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे.