इंग्लंड कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार जो रूटने शुक्रवारी (१५ एप्रिल) मोठा निर्णय घेतला. त्याने कसोटी संघाचं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केलीय. यासह रूटची कर्णधारपदाची पाच वर्षांची कारकीर्द येथेच संपली. मागील काही काळापासून इंग्लंडच्या कसोटी संघाचे सातत्याने होत असलेले पराभव या निर्णयाला कारणीभूत ठरलेत. यात नुकताच एशेसमध्ये ४-० ने झालेल्या परभवाचाही समावेश आहे. सातत्याने होणाऱ्या पराभवाच्या मालिकेनंतर रूटच्या नेतृत्वावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या पार्श्वभूमीवर रूटने हा निर्णय घेतला.
या निर्णयाची घोषणा करताना जो रूट म्हणाला, “कॅरेबियाच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर आणि विचार करण्यासाठी वेळ घेतल्यानंतर मी इंग्लंडच्या कसोटी संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. हा माझ्या करियरमधील सर्वात आव्हानात्मक निर्णय ठरला. मात्र, मी माझ्या कुटुंबासोबत आणि जवळच्या लोकांसोबत यावर चर्चा केली. मला माहिती आहे की ही वेळ योग्य आहे.”
“माझ्या देशाचं नेतृत्व केल्याचा मला अभिमान आहे”
“माझ्या देशाचं नेतृत्व केलं त्याचा मला अभिमान आहे. मी मागील ५ वर्षांकडे खूप अभिमानाने पाहिल. देशाच्या कसोटी क्रिकेट संघाचं नेतृत्व करणे खूप मोठी सन्मानाची गोष्ट आहे,” असं जो रूटने सांगितलं.
“जगात इतके चाहते मिळणं खूप सुदैवाची गोष्ट”
रूटने या पार्श्वभूमीवर आपले कुटुंब, मित्र आणि इंग्लंड क्रिकेट मंडळाचे धन्यवाद मानले. “जगात इतके चाहते मिळणं खूप सुदैवाची गोष्ट आहे. मी देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी उत्सूक आहे. यापुढे मी पुढील कर्णधाराला मदत करण्यासाठी प्रयत्न करेल,” असंही रूटने नमूद केलं.
हेही वाचा : पत्नीचं शतक पूर्ण होताच तणावात असलेल्या मिचेल स्टार्कच्या चेहऱ्यावर हसू, VIDEO पाहा…
विशेष म्हणजे जो रूट सद्यस्थितीत इंग्लंडचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा कर्णधार आहे. एलिस्टर कुक सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. संघाचा कर्णधार म्हणून जो रूटने १४ शतकं झळकावली आहेत. रूटने कर्णधार असताना ५ हजार २९५ धावा केल्यात. तो ग्रीम स्मिथ, एलन बॉर्डर, रिकी पाँटिंग आणि विराट कोहलीनंतर जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे.