पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने (Danish Kaneria) माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवर (Shahid Afridi) गैरवर्तनाचे गंभीर आरोप केले आहेत. तसेच पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे (PCB) दानिशने आपल्यावरील आजीवन बंदी हटवण्याची मागणी केलीय. दानिश कनेरियावर २०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाले होते. या प्रकरणी दानिशला दोषी ठरवून त्याच्यावर क्रिकेट खेळण्यास आजीवन बंदी घालण्यात आली होती. मात्र, दानिश कनेरियाने शाहिद आफ्रिदीने षडयंत्र रचून या प्रकरणात फसवल्याचा गंभीर आरोप केला.
विशेष म्हणजे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) या प्रकरणात सर्वात आधी गंभीर आरोप केला होता. हिंदू असल्याने पाकिस्तान संघाने दानिश कनेरियासोबत अन्याय केला होता, असं स्पष्ट मत शोएब अख्तरने व्यक्त केलं होतं.
“हिंदू असल्याने पाकिस्तानी क्रिकेट संघात माझ्यासोबत अन्याय”
आयएएनएससोबत बोलताना दानिश कनेरिया म्हणाला, “शोएब अख्तर सार्वजनिकपणे माझ्यावरील अन्यायावर बोलणारे पहिले व्यक्ती होते. त्यांनी मी हिंदू असल्याने माझ्यासोबत पाकिस्तान संघात गैरव्यवहार झाला होता हे सांगितलं. मात्र, नंतर अनेक अधिकाऱ्यांनी शोएब अख्तर यांच्यावर दबाव टाकला. त्यानंतर शोएब अख्तर यांनी याबाबत बोलणं बंद केलं. मात्र, हो माझ्यासोबत असं घडलंय. शाहिद आफ्रिदीने माझा अपमान केला. आम्ही एकाच पाकिस्ताक क्रिकेटं संघात खेळलो. मात्र, शाहिद आफ्रिदीने मला वनडे क्रिकेटमध्ये खेळू दिलं नाही.”
“मी संघात नसावं असं शाहिद आफ्रिदीची इच्छा होती”
“मी पाकिस्तान क्रिकेट संघात असू नये अशी शाहिद आफ्रिदीची इच्छा होती. तो एक खोटारडा व्यक्ती आहे. असं असलं तरी माझं लक्ष्य केवळ क्रिकेटवर होतं. मी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत होतो. शाहिद आफ्रिदी इतर खेळाडूंकडे जाऊन माझ्याविरोधात बोलत असे. मी चांगली कामगिरी करत होतो. त्यामुळे शाहिद आफ्रिदीला माझ्याविषयी राग होता,” असं दानिश कनेरियाने सांगितलं.
हेही वाचा : सत्ता गेली पण भारतप्रेम संपलं नाही, इम्रान खानचा पुन्हा भारतावर कौतुकाचा वर्षाव
“मला अभिमान आहे की मी पाकिस्तानच्या क्रिकेट संघात खेळलो. यासाठी मी पीसीबीचे आभार मानतो,” अशीही भावना दानिशने व्यक्त केली.
“मला स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकवलं”
दानिश कनेरिया म्हणाला, “मी आफ्रिदीच्या नेतृत्वात खेळलो नसतो तर १८ पेक्षा अधिक सामने खेळलो असतो. मी कधीही कोणत्याही स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी नव्हतो. माझ्या विरोधात खोटे स्पॉट फिक्सिंगचे आरोप करण्यात आले. माझं नाव या फिक्सिंगमधील आरोपीसोबत जोडलं गेलं.”
हेही वाचा : विश्लेषण: चीननंतर आता पाकिस्तानमधील पदवींची मान्यता भारताकडून रद्द; पण कारण काय?
“खरंतर हा आरोपी आफ्रिदीसह इतर अनेक पाकिस्तानी क्रिकेटर्सचा मित्र होता. मात्र, तरी यात माझं नाव कसं आलं हे मला माहिती नाही. मी पीसीबीकडे माझ्यावरील बंदी हटवण्याची मागणी करतो. जेणेकरून मला क्रिकेट खेळता येईल,” अशी मागणी दानिशने केली.