Rohit Sharma Fat: पाकिस्तान आणि युएईमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दामदार कामगिरी करत असून, गट फेरीतील सर्व सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली आहे. दुसरीकडे, काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माला लठ्ठ आणि अकार्यक्षम कर्णधार असल्याची टीका केली आहे. शमा मोहम्मद यांच्या या विधानामुळे देशातील राजकारण तापले आहे. भाजपाने या विधानाला बॉडी शेमिंग आणि अपमानास्पद म्हटले आहे. तर, दुसरीकडे तृणमूल काँग्रेसचे नेते सौगत रॉय यांनी रोहित शर्माच्या विरोधातील काँग्रेस प्रवक्त्यांच्या विधानाचे समर्थन केले आहे.

भारत जिंकतो कारण…

तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगर रॉय यांनी शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माविरुद्ध केलेल्या विधानाचे समर्थन केले आहे. यासोबतच रॉय यांनी रोहित शर्मावर टीकाही केली आहे. सौगत रॉय म्हणाले, “काँग्रेस नेत्याने जे म्हटले आहे ते बरोबर आहे. रोहित शर्मा संघात नसावा.”

“मी ऐकले आहे की रोहित शर्माची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. त्याने एक शतक झळकावले, पण त्याशिवाय, तो २, ३, ४ किंवा ५ धावा केल्यानंतर बाद होतो. तो संघात नसावा. भारत जिंकतो कारण इतर खेळाडू चांगले खेळतात, परंतु कर्णधार योगदान देत नाही,” असे रॉय आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे.

काल भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यादरम्यान एक्स वर लिहिलेल्या पोस्टमध्ये, शमा मोहम्मद म्हणाल्या की, रोहित शर्मा “एका खेळाडू म्हणून खूप लठ्ठ आहे. त्याने वजन कमी करणे आवश्यक आहे! आणि अर्थातच तो भारताचा आतापर्यंतचा सर्वात कमी प्रभावशाली कर्णधार आहे.”

शमा मोहम्मद यांचे स्पष्टीकरण

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माबाबत एक्सवर केलेल्या पोस्टबाबत बोलताना काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद म्हणाल्या, “मी कोणाचाही अपमान करण्यासाठी पोस्ट केली नाही. त्या पोस्टमध्ये मी म्हटले होते की, एक खेळाडू म्हणून त्याचे वजन जास्त आहे. हे बॉडी शेमिंग नाही. मी म्हणाले की, तो एक अप्रभावी कर्णधार आहे कारण मी त्याची तुलना मागील कर्णधारांशी केली होती. जेव्हा विराट कोहली कर्णधार होता तेव्हा तो मोहम्मद शमीबरोबर भक्कमपणे उभा होता, तेव्हा भाजपच्या लोकांनी त्याच्यावर टीका का केली? तो एक चांगला कर्णधार होता. तो खेळाडूंना प्रोत्साहन देतो आणि धावा काढतो. इतर संघांचे खेळाडू जेव्हा चांगले खेळतात तेव्हा तो त्यांची प्रशंसा देखील करतो. माझ्या मते विराट एक चांगला कर्णधार आहे. मी एक खेळाडू आहे, म्हणून मी फिटनेसवर बोलते. खेळाडूंनी फिट असले पाहिजे.”

Story img Loader