भारताचे दिग्गज क्रिकेटर विरेंदर सेहवाग, युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी ते पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहेत. भारताचे हे तिन्ही खेळाडू इंडिया महाराजा टीमचा भाग असणार आहेत. १० जानेवारीला ओमानमध्ये लेजंड लीग क्रिकेटचं (LLC) उद्घाटन होणार आहे. तेथेच सेहवाग, युवराज आणि हरभजन पुन्हा एकदा खेळताना दिसतील.
एलएलसी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंची लीग आहे. या लीगमध्ये ३ संघ आहेत. एक इंडिया महाराजा, दुसरी टीम आशिया आणि तिसरी उर्वरित विश्व. या लीगच्या प्रमुखपदी रवी शास्त्री आहेत.
आणखी कोणत्या भारतीय खेळाडूंचा समावेश
सेहवाग, युवराज आणि हरभजनशिवाय इंडिया महाराजा टीममध्ये इरफान पठाण, यूसुफ पठाण, बद्रीनाथ, आरपी सिंह, प्रज्ञान ओझा, नमन ओझा, मनप्रीत गोनी, हेमांग बदानी, वेणुगोपाल राव, मुनाफ पटेल, संजय बांगड, नयन मोंगिया आणि अमित भंडारी यांचा समावेश आहे. अद्याप या संघाचा कर्णधार कोण असणार हे निश्चित झालेलं नाही.
आशिया लायन्स नावाच्या आशियाई टीममध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेचे माजी दिग्गज क्रिकेटर शोएब अख्तर, शाहिद अफ्रिदी, सनथ जयसूर्या, मुथय्या मुरलीधरन, कामरान अकमल, चमिंडा वास, रोमेश कालूवितर्णा, तिलकरत्ने दिलशान, अजहर महमूद, उपुल थरंगा, मिसबाह उल हक, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, मोहम्मद यूसुफ आणि उमर गुल यांचा समावेश आहे. अफगानिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगान देखील आशियाई टीमचा भाग असेल.
तिसरा संघ उर्वरित विश्वची घोषणा बाकी
तिसऱ्या संघाच्या खेळाडूंची घोषणा अद्याप बाकी आहे. या संघात ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडीज सारख्या संघांच्या खेळाडूंचा समावेश असण्याची शक्यता आहे. अनेक माजी खेळाडूंसोबत याविषयी चर्चा सुरू आहे.
हेही वाचा : “१९८३ विश्वचषकात मला ‘या’ दोनच गोष्टींचं दुःख वाटतं”, कपिल देव यांनी सांगितली मनातील सल
रवी शास्त्री म्हणाले, “ते खऱ्या राजांप्रमाणे येतील, पाहतील आणि सर्वांच्या मनावर राज्य करतील. भारताचे क्रिकेट महाराजा आशिया आणि उर्वरित विश्वाच्या दोन संघांविरोधात मुकाबला करण्यासाठी येत आहेत. जेव्हा सेहवाग, युवराज आणि भज्जी, अफ्रिदी, मुरली, चामिंडा, शोएबविरोधात खेळतील तेव्हा क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा सामना असेल.”