Varun Chakraborty Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ५ मार्च रोजी ताजी एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली असून, यामध्ये भारतीय खेळाडूंचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले. गोलंदाजी क्रमवारीत मोहम्मद शमीच्या रँकिंगवर सर्वांच्या नजरा खिळल्या असताना, वरुण चक्रवर्तीने सर्वात मोठी कामगिरी दाखवण्यात यश मिळवले. चक्रवर्तीला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत फक्त २ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे ज्यामध्ये त्याने एकूण ७ विकेट घेतल्या आहेत. यापैकी, न्यूझीलंडविरुद्धच्या गट फेरीतील सामन्यात त्याने ५ विकेट्स घेतल्या, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने २ विकेट्स घेतल्या. चक्रवर्ती व्यतिरिक्त, शमीने आयसीसीच्या गोलंदाजी क्रमवारीत सुधारणा केल्याचे दिसून आले.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गट फेरीतील पहिल्या २ सामन्यांमध्ये टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. परंतु त्यानंतर चक्रवर्तीला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात संधी मिळाली आणि त्याने ५ विकेट्स घेत त्याचा पुरेपूर फायदा उठवला. त्यानंतर चक्रवर्तीने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्रॅव्हिस हेडची मोठी विकेटही घेतली.

१४३ स्थानांची झेप

आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत वरुण चक्रवर्तीने एकूण १४३ स्थानांनी झेप घेतली आहे, ज्यामुळे तो आता अव्वल १०० गोलंदाजांमध्ये पोहोचला आहे. वरुण चक्रवर्ती एकूण ३७१ रेटिंग गुणांसह क्रमवारीत ९६ व्या स्थानावर आहे. वरुण व्यतिरिक्त, मोहम्मद शमीनेही आयसीसीच्या गोलंदाजांच्या क्रमवारीत तीन स्थानांनी झेप घेतली आहे, ज्यामध्ये तो आता ६०९ रेटिंग गुणांसह ११ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

कुलदीप यादव तीन स्थानांचा तोटा, अक्षर पटेलची ७ स्थानांनी झेप

भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आतापर्यंत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याच्या गोलंदाजीने अपेक्षित प्रभाव पाडू शकलेला नाही. गोलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत त्याला तीन स्थानांचा तोटा झाला आहे. ज्यामुळे तो आता ६३७ रेटिंग गुणांसह सहाव्या स्थानावर घसरला आहे. तर, अक्षर पटेलने ७ स्थानांनी झेप घेतली आहे आणि तो ४९९ रेटिंग गुणांसह ४० व्या स्थानावर पोहोचला आहे.

भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात

दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघाने दमदार कामगिरी केली असून, उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. दुसरीकडे आज उपांत्य फेरीचा दुसरा सामना न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू आहे. या सामन्यातील विजेता ९ मार्चला दुबईत भारताविरुद्ध अंतिम सामना खेळेल.

Story img Loader