Virat Kohli Vs Babar Azam: यजमान पाकिस्तान क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खराब कामगिरी केल्यानंतर बाबर आझमवर बरीच टीका होत आहे. त्यानंतर बाबर आझमची तुलना विराट कोहलीशी करू नये, असे अनेक माजी क्रिकेटपटूंनी म्हटले आहे. त्यांच्या मते, बाबर आझमची विराट कोहलीशी कोणतीही स्पर्धा होऊ शकत नाही. अशात आता, मोहसीन खान यांनी माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने बाबर आझमची बाजू घेतली आहे. मोहसिन खान यांनी उलट मत व्यक्त करताना म्हटले की, “बाबर आझमच्या तुलनेत विराट कोहली शून्य आहे.”

दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानात करण्यात आले आहे, पण त्याचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पाकिस्तानच्या या खराब कामगिरीसाठी बाबर आझमलाही जबाबदार धरण्यात येत आहे. पाकिस्तानच्या अनेक माजी खेळाडूंसह पाकिस्तानी चाहत्यांनीही बाबर आझमवर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे.

कोहली शून्य…

बाबर आझम बॅट चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काहीच विशेष कामगिरी करू शकला नाही. मात्र, दुसरीकडे विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध दमदार कामगिरी करत शतक ठोकले. पण असे असूनही, मोहसीन खान विराट कोहलीला कमी लेखत आहे. एआरवाय न्यूजवर बोलताना मोहसीन खान म्हणाले, “सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की बाबर आझमच्या तुलनेत विराट कोहली काहीच नाही. कोहली शून्य आहे.” ते पुढे म्हणाले की, “आपण कोण चांगला खेळाडू आहे याबद्दल बोलत नाही आहोत. आपण पाकिस्तान क्रिकेटबद्दल बोलत आहोत, जे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. कोणतीही योजना नाही, कोणतीही रणनीती नाही, कोणीही जबाबदारी घेत नाही.”

बाबर आझमची चॅम्पियन्स ट्रॉफीतील कामगिरी

२०२५ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बाबर आझमची वैयक्तिक कामगिरी बरी होती. पण पाकिस्तान स्पर्धेतून पहिल्याच फेरीत बाहेर पडल्यामुळे त्याला टीकेचा सामना करावा लागला. न्यूझीलंडच्या ३२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बाबरने ९० चेंडू ६४ धावा केल्या. या डावात त्याच्या स्ट्राईक रेट आणि संथ खेळीवर मोठी टीका झाली. भारताविरुद्धच्या सामन्यात डावाची सुरुवात करताना, बाबर २६ चेंडूत २३ धावा काढून बाद झाला होता. या सामन्यात पाकिस्तानचा सहा विकेट्सनी पराभव झाला आणि त्यामुळे त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते.

विराट कोहलीची चॅम्पियन्स ट्रॉफीतील कामगिरी

दुसरीकडे विराट कोहलीने २०२५ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत भारताच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात शतक झळकावत भारताला विजय मिळवून दिला होता. आज न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात त्याला खास कामगिरी करता आली नसली तरी, तो भारताकडून ३०० एकदिवसीय सामने खेळणारा ७ वा क्रिकेटपटू ठरला आहे.

Story img Loader