भारतीय संघातील एकेकाळचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणवर रक्षाबंधनच्या मुहुर्तावर पुन्हा एकदा कट्टरपंथियांनी निशाणा साधला. सोमवारी रक्षाबंधनच्या शुभेच्छा देण्यासाठी इरफानने इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक फोटो शेअर केला होता. या फोटोत त्याने हातात राखी बांधली असल्यामुळे कट्टरपंथियांनी त्याच्यावर चांगलाच राग व्यक्त केलाय.राखी हातामध्ये बांधून इरफानने आमच्या धर्मभावना दुखावल्या आहेत, अशा भावना त्याच्या काही चाहत्यांमधून उमटताना दिसत आहे.

इरफानने रक्षाबंधनच्या शुभेच्य़ा देताना एक सेल्फी पोस्ट केला होता. या फोटोत इरफानने राखी बांधल्याचे दिसत आहे. त्याच्या या फोटोनंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. मुस्लीम असून रक्षाबंधनच्या शुभेच्छा देणाऱ्या इरफानचे काही चाहत्यांनी कौतुकही केले. मात्र काही कट्टरपंथियांनी त्याच्या या कृत्याला धर्मविरोधी म्हटले. यापूर्वी पत्नीसोबतचा एक फोटो शेअर केल्यामुळे इरफानला ट्रोल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी इरफानने पत्नीसोबतचा एक फोटो फेसबुकवर शेअर केला. यावेळी देखील त्याला चाहत्यांच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. तू पठाण आहेस, आणि एका पठाणाने आपल्या पत्नीसोबतचे असे फोटो टाकणं गैर असल्याचं इरफानच्या चाहत्यांनी त्याला सुनावलं होतं. दुसऱ्यांदा ट्रोलिंगचा प्रकार घडल्यानंतर इरफानने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गेले अनेक महिने इरफान पठाण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या सत्रात तो गुजरातच्या संघातून मैदानात उतरला होता.

फोटोवरुन एखाद्या खेळाडूला ट्रोल करणं हा नक्कीच दुर्दैवी प्रकार आहे. दिवसेंदिवस सोशल नेटवर्किंग साईट्सवर मोठ-मोठ्या व्यक्तींना ट्रोल करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. यात धर्माच्या आधारावर एखाद्या खेळाडूवर टीका करणाऱ्यांच्या संख्याही वाढली आहे. पठाणपूर्वी गेल्या महिन्यात भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी याला देखील ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मुलीचा वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी तसेच पत्नीचा हिजाब शिवाय फोटो काढल्यावरुन कट्टरपंथियांनी त्याच्यावर टीका केली होती.

Story img Loader