Kapil Dev to Share Screen with Superstar Rajinikanth: १९८३ मध्ये भारताला विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल देव लवकरच एका चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहेत. याबाबत सुपरस्टार रजनीकांत यांनी माहिती दिली आहे. कपिल देव सुपरस्टार रजनीकांतसोबत ‘लाल सलाम’ या चित्रपटात दिसणार आहेत. खुद्द रजनीकांत यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. या बातमीनंतर कपिल देव यांच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
लाल सलाम हा एक तमिळ चित्रपट असून तो रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आर धनुष दिग्दर्शित करणार आहेत. या चित्रपटात विष्णू विशाल आणि विक्रांत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रजनीकांत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, कपिल देव लाल सलाम या चित्रपटात स्क्रीन शेअर करणार आहेत. या ट्विटमध्ये रजनीकांत यांनी स्वतःचा आणि कपिल देवचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही एकमेकांशी बोलताना दिसत आहेत.
सुपरस्टार रजनीकांत यांनी एक फोटो शेअर करताना लिहिले, “प्रथमच क्रिकेट विश्वचषक जिंकून भारताचा अभिमान वाढवणारे महान, सर्वात आदरणीय आणि आश्चर्यकारक मानव, कपिल देव जी यांच्यासोबत काम करणे हा एक सन्मान आणि सौभाग्य आहे.”
कपिल देव यांनी याआधी अनेक चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकारांची भूमिका साकारली आहे. ‘मुझसे शादी करोगी’, ‘इक्बाल’, ‘चैन खुली की मन कुली’ आणि ‘डबल एक्सएल’ या चित्रपटांमध्ये त्यानी स्वत:ची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर २०२१ मध्ये त्यांच्या जीवनावर ८३ नावाचा चित्रपट देखील बनवण्यात आला आहे ज्यामध्ये रणवीर सिंगने त्यांची भूमिका केली होती. तसेच दीपिका पदुकोणने त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या शेवटी कपिल देवही दिसले होते.
हेही वाचा – DC vs CSK: ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवेची कमाल, आयपीएल २०२३ मध्ये ‘हा’ कारनामा करणारी ठरली चौथी जोडी
विशेष म्हणजे, कपिल देव यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण १३१ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी ५२४८ धावा केल्या. त्याचबरोबर गोलंदाजी करताना ४३४ विकेट्सही घेतल्या आहेत. एकदिवसीय फॉर्मेटबद्दल सांगायचे तर कपिल देव यांनी एकूण २२५ सामने खेळले. ज्यामध्ये त्यांनी ३७८३ धावा केल्या असून गोलंदाजीत २५३ विकेट घेतल्या.