सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल सपना गिल आणि क्रिकेटपटू पृथ्वी शॉ यांच्यामध्ये सेल्फी काढण्यावरुन वाद झाल्याची घटना घडली होती. हे प्रकरण अद्याप शांत झालं नाही. सपना गिलला जामीन मिळाल्यानंतर तिने मुंबई विमानतळ पोलीस स्थानकात क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र आशिष यादव यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

सेल्फी वादानंतर पृथ्वी शॉचा मित्र आशिष यादव याच्या गाडीची काच फोडण्यात आली होती. त्याबद्दल ओशिवरा पोलिसांनी आठ लोकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये सपना गिलचाही समावेश होता. पृथ्वी शॉने चौथ्यांदा सेल्फी देण्यास नकार दिल्यानंतर हा वाद उफाळल्याचं सांगण्यात येत होतं.

पण आता सपना गिलने पृथ्वी शॉवर गंभीर आरोप केले आहेत. आपण पृथ्वी शॉला सेल्फी घेण्यासाठी विचारणाच केली नव्हती. आम्ही कोणालाही मारहाण केली नाही, पैसेही मागितले नाहीत. त्यांनी आमच्यावर चुकीचे आरोप केले. आम्ही पार्टीचा आनंद घेत होतो, त्यामुळे माझ्या एका मित्राने व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्राने माझ्या मित्राला मारहाण करायला सुरुवात केली.

हेही वाचा- पृथ्वी शॉच्या अडचणी वाढू शकतात; जामीन मिळताच सपना गिलने दाखल केले गंभीर गुन्हे

“यामुळे मी तिथे गेले आणि त्यांना थांबवलं. पुरावा म्हणून माझ्या मित्राने व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी (पृथ्वी शॉ आणि त्याचे मित्र) मला बेसबॉलने मारहाण केली. त्यापैकी एक किंवा दोन तरुणांनी मला मारलं आणि माझ्या प्रायव्हेट पार्टला हात लावला आणि मला चापटही मारली,” असे गंभीर आरोप सपना गिलने केले आहेत.

“आम्ही त्यांना विमानतळावर रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पृथ्वी आणि त्याच्या मित्राने जमावाला गोळा करत घटनास्थळावरून पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी आमची माफीही मागितली. पण १६ फेब्रुवारीला त्यांनी माझ्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे, असं कळालं. त्यामुळे मीही २० फेब्रुवारीला तक्रार दाखल केली”, असंही सपना गिल म्हणाली.