Rashid Khan to donate World Cup match fee to Afghanistan earthquake relief: अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान हा जगातील लोकप्रिय आणि महान गोलंदाज आहे. तो जितका चांगला गोलंदाज आहे, तितकाच तो एक चांगला माणूसही आहे. याचा पुरावा अनेकदा त्याने आपल्या चांगल्या स्वभावाने दिला, पण आज त्याने याचा आणखी एक पुरावा दिला आहे. वास्तविक राशिद खानने वर्ल्ड कपमध्ये मिळालेली संपूर्ण मॅच फी दान करण्याची घोषणा केली आहे. अफगाणिस्तानमधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी आपली रक्कम दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
राशिद खानने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याची घोषणा केली आहे. त्यांनी एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, “अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील प्रांतांमध्ये (हेरत, फराह आणि बादघिस) झालेल्या भूकंपाच्या दुर्घटनेबद्दल ऐकून मला खूप दुःख झाले आहे. भूकंपामुळे प्रभावित झालेल्यांना मदत करण्यासाठी मी माझे सर्व प्रयत्न समर्पित करत आहे. क्रिकेट विश्वचषक २०२३ ची मॅच फी दान करत आहे. आम्ही लवकरच एक फंड रेसिंग मोहीम सुरू करणार आहोत, ज्याद्वारे आम्ही पीडितांना मदत करू शकणाऱ्या लोकांकडून मदत घेऊ.”
खरं तर, शनिवारी अफगाणिस्तानमध्ये एक भयानक भूकंप झाला, ज्यामुळे सर्वत्र विध्वंसाचे दृश्य पसरले. अफगाणिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या तालिबान सरकारच्या म्हणण्यानुसार, या भूकंपामुळे आतापर्यंत २००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, ९००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत आणि १३००० हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत.
अफगाणिस्तानातील या भूकंपामुळे मृत आणि जखमी झालेल्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानचा सुपरस्टार रशीद खान सध्या भारतात आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक खेळत आहे, परंतु त्याला आपल्या देशवासियांची खूप काळजी आहे. म्हणूनच त्याने विश्वचषकाची संपूर्ण मॅच फी दान करण्याचा निर्णय घेतला आहे.