सुरुवातीपासूनच क्रिकेट आणि बॉलिवुड यांचा फार जवळचा संबंध राहिला आहे. अनेक बॉलिवुड कलाकार क्रिकेटचे चाहते आहेत. तर, अनेक क्रिकेट खेळाडूंना बॉलिवुड चित्रपट आणि गाण्यांमध्ये रस आहे. अनेकदा भारतीय संघातील खेळाडू बॉलिवुड गाण्यांवर ठेका धरताना दिसले आहेत. सध्या भारतीय संघातील एक खेळाडू असा आहे ज्याला बॉलिवुडमधील गाण्याचे फार वेड आहे. तो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सतत या गाण्यांचा वापर करून रील्स अपलोड करत असतो. क्रिकेटच्या चाहत्यांना एव्हाना हा खेळाडू कोण आहे, याचा अंदाज आला असेल. आपल्या फलंदाजीमुळे चर्चेत असलेला श्रेयस अय्यर गेल्या काही दिवसांपासून आपल्या इन्स्टाग्राम रील्समुळे चर्चेत आला आहे. नुकतेच त्याचे एक नवीन रील व्हायरल झाले आहे. त्याच्या या रीलने महिला चाहत्यांना अक्षरश: वेड लावले आहे.

सध्या सर्वत्र लग्नसराई सुरू आहे. याचा फायदा घेत श्रेयसने आपले नवीन रील तयार केले आहे. या रीलमध्ये तो सोसायटीच्या लॉनमध्ये मित्रासोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे. त्याचवेळी बॅकग्राऊंडला ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील ‘बोले चुडियाँ’ हे गाण्याचे बोल ऐकू येत आहेत. याच गाण्याच्या तालावर फलंदाजी करणारा श्रेयस आणि यष्टीरक्षण करणारा त्याचा मित्र आपली कंबर हलवतात. नाचण्याच्या नादात श्रेयसचा मित्र त्याला यष्टीचित करतो व त्यानंतर श्रेयस चिडून बॅट टाकून निघून जातो, असे या रीलमध्ये दिसत आहे. ‘जेव्हा तुमच्या सोसायटीमध्ये लग्न असते’, या कॅप्शनसह हे रील शेअर करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच श्रेयस नवीन गाडीच्या खरेदीमुळे सोशल मीडियावर चर्चेत होता. श्रेयसने अय्यर २.४५ कोटी रुपये किंमत असलेली मर्सिडीज एएमजी जी ६३ ३ मॅटिक एसयुव्ही ही गाडी खरेदी केली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या १५व्या हंगामामध्ये श्रेयसला विशेष कामगिरी करता आली नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी ट्वेंटी मालिकेत त्याने चांगली कामगिरी करावी, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. ९ जूनपासून सुरू होणाऱ्या यामालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

Story img Loader