मागील काही काळापासून वर्णद्वेषाच्या प्रकरणांनी डोके वर काढले आहे. एकामागोमाग एक अशा अनेकांनी आपल्या बाबत घडलेल्या या वाईट गोष्टीबाबत खुलासा केला. यात क्रीडाक्षेत्रही मागे राहिलेले नाही. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज उस्मान ख्वाजानेही वर्णद्वेषाबद्दल आपले मौन सोडत धक्कादायक खुलासा केला आहे. ऑस्ट्रेलियात स्थायिक झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात वर्णद्वेषापासून उद्भवलेल्या विविध आव्हानांना सामोरे जावे लागले असल्याचे ख्वाजाने सांगितले.

ख्वाजाचे कुटुंब पाकिस्तानहून ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले होते. ख्वाजाने क्रिकइन्फोला सांगितले, “जेव्हा मी ऑस्ट्रेलियात मोठा होत होतो, तेव्हा ऑस्ट्रेलियाकडून कधीच खेळू शकणार नाही, असे मला बर्‍याचदा सांगितले गेले. मला सांगण्यात आले, की माझी कातडीचा ​​रंग योग्य नाही. संघ निवडीदरम्यान मला तंदुरुस्त नसल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी अशी मानसिकता होती. मात्र आता ते बदलू लागले आहे.”

हेही वाचा – KKRला जबर धक्का..! पॅट कमिन्सची आयपीएलमधून माघार

 

३४ वर्षीय ख्वाजाने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाकडून ४४ कसोटी सामन्यांमध्ये २९०० धावा केल्या आहेत. २०११च्या सिडनी येथे झालेल्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात ख्वाजाने ऑस्ट्रेलियामध्ये पदार्पण केले. ख्वाजा आयपीएलचाही भाग होता. २०१६च्या हंगामात त्याने महेंद्रसिंह धोनीसोबत रायझिंग सुपर जायंट्सचे ड्रेसिंग रुम शेअर केले होते.

ख्वाजा म्हणाला, “सध्या परिस्थिती बरीच चांगली आहे. मी राज्यस्तरावर असे बरेच क्रिकेटपटू पाहत आहे, विशेषत: उपखंडातील पार्श्वभूमीवर, जे ऑस्ट्रेलियात खेळत आहेत. मी खेळायला सुरवात केली, तेव्हा ही अशी परिस्थिती नव्हती. जेव्हा मी घरगुती क्रिकेट खेळत होतो, तेव्हा उपखंडातील मी एकटाच खेळाडू होतो.”

हेही वाचा – पाक कर्णधार बाबर आझमची ‘बाबर की कहाणी’ होतेय जोरदार व्हायरल!

ऑस्ट्रेलियाकडून ४० एकदिवसीय सामन्यांमध्ये १५०० धावा फटकावणार्‍या ख्वाजाने सांगितले, की त्यांची टीम विविधतेच्या बाबतीत इंग्लंड संघाकडून धडा घेऊ शकेल. ख्वाजा म्हणाला, “आम्हाला अजून खूप पुढे जायचे आहे आणि मी इंग्लंडच्या संघाकडे पाहत आहे, त्यांच्यात दीर्घकाळ वैविध्य आहे. तो आमच्यापेक्षा जुना देश आहे, परंतु मला हे वैविध्य दिसते. ऑस्ट्रेलियाला इथे पोहोचणे गरजेचे आहे.”

Story img Loader