ऋषिकेश बामणे, मुंबई

सचिन तेंडुलकरप्रमाणे क्रिकेटचे मैदान गाजवावे, हे स्वप्न उराशी बाळगून काही वर्षांपूर्वी मुंबईत आलेला यशस्वी जैस्वाल आज प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सातत्याने छाप पाडत आहे. त्याच्या या यशामुळेच उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या जैस्वाल कुटुंबीयांचे आयुष्य पालटले आहे.

१७ वर्षीय यशस्वीने सध्या सुरू असलेल्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत एक द्विशतक आणि दोन शतके झळकावत क्रिकेटविश्वाला त्याची दखल घेण्यास भाग पाडले. परंतु सोमवारी झालेल्या छत्तीसगढविरुद्धच्या लढतीत यशस्वीच्या अर्धशतकानंतरही मुंबईला दुर्दैवीरीत्या उपांत्यपूर्व फेरीतून गाशा गुंडाळावा लागला. ‘‘यशस्वीचा विजय हजारे स्पर्धेतील खेळ पाहून फार आनंद झाला. परंतु मुंबईला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आल्याने त्याची मेहनत वाया गेली, याचेही वाईट वाटत आहे,’’ असे त्याचे वडील भुपेंद्र म्हणाले.

२०११मध्ये मुंबईत आलेल्या यशस्वीला सुरुवातीच्या काळात उदरनिर्वाह करण्यासाठी आझाद मैदानाबाहेर पाणीपुरी विक्रीचा व्यवसायही करावा लागला. परंतु २०१३मध्ये प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी त्याच्यातील कौशल्य ओळखून त्याला पाठबळ दिले. २०१८च्या आशिया चषक युवा स्पर्धेतही यशस्वीने सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवला होता.

उत्तर प्रदेश येथील भदोही जिल्ह्य़ात राहणारे भुपेंद्र सध्या रंगविक्रीचा व्यवसाय करत असून यशस्वीव्यतिरिक्त आणखी तीन मुले आणि पत्नी कांचन असा त्यांचा परिवार आहे. यशस्वीच्या द्विशतकानंतर कशा प्रकारे आनंद साजरा केला, असे विचारले असता भुपेंद्र म्हणाले, ‘‘ज्या दिवशी यशस्वीने द्विशतक झळकावले, तेव्हा आमच्या येथे दिवाळी साजरी करण्यात आली. यशस्वीचे मोठे फलक लावून आम्ही मिरवणूक काढली. सर्व शेजाऱ्यांना मिठाईही वाटली. त्याशिवाय येथील नगराध्यक्ष बिना चौरसिया यांनी आमचा आर्थिक मदतीसह सत्कारही केला.’’

‘‘यशस्वीने एकेक करून यशाची शिखरे सर केल्यामुळे आता आमच्या वाटय़ालाही चांगले दिवस आले आहेत. एकेकाळी आमच्या दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत असायची. त्या वेळी कॅटररकडे मी काम करायचो. परंतु आता यशस्वीच्या लक्षवेधी कामगिरीमुळे आम्हाला बऱ्याच कार्यक्रमांसाठी निमंत्रित केले जाते. त्याशिवाय नातेवाईक आणि राजकीय नेत्यांकडूनही आम्हाला मानसन्मान देण्यात येतो,’’ असे भुपेंद्र यांनी सांगितले.

‘‘यशस्वी मुंबईला गेल्यापासून एकही दिवस असा गेला नाही की, आम्ही त्याच्याशी संवाद साधला नाही. १०-१२ वर्षांपूर्वीची आमची परिस्थिती आठवून आजही अंगावर काटा येतो. त्यामुळेच यशस्वीची प्रगती मला स्वत:लाही फार प्रेरणा देते. त्याशिवाय यशस्वीने आगामी मुश्ताक अली स्पर्धेतही छाप पाडून भविष्यात भारताचे प्रतिनिधित्व करावे,’’ असेही भुपेंद्र यांनी सांगितले.

सचिनच्या प्रेरणेने मुंबई गाठली!

‘‘यशस्वीला बालपणापासूनच सचिनसारखी फलंदाजी करण्याचे लक्ष्य होते. सचिनसारखी फलंदाजी करणे तुला जमणार आहे का? असे कित्येक वेळा त्याचे वडील मुद्दामहून त्याला खिजवायचे. परंतु यशस्वीने मनाशी गाठ बांधली होती आणि अखेरीस आम्ही त्याला मुंबईत काकांकडे पाठवण्याचा निर्णय घेतला,’’ असे यशस्वीची आई कांचन यांनी सांगितले.