माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग आपल्या धडाकेबाज खेळासाठी ओळखला जातो. क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्याचा सोशल मीडियावरील वावर वाढला आहे. सोशल मीडियावर स्वत: केलेल्या पोस्ट आणि इतर खेळाडूंच्या पोस्टवर मिश्किल कमेंट्स केल्यामुळे तो सतत चर्चेत असतो. आता देखील तो आपल्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. युवराजने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये त्याची आई, शबनम सिंग यांनी एक तक्रारवजा खुलासा केला आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर युवराजने दुसरे लग्न केल्याचे शबनम सिंग यांनी सांगितले आहे. शिवाय, युवराजची ही दुसरी पत्नी कोण आहे, हेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने १० जून २०१९ रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. या घटनेला काल तीन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त युवराजने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘आज मला क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन तीन वर्षे झाली आहेत. पण, तुमचे माझ्यावरील प्रेम अजूनच वाढले आहे. मला सर्व प्रकारे पाठिंबा दिल्याबद्दल आणि हा सुंदर व्हिडिओ बनवल्याबद्दल माझे मित्र, कुटुंब आणि चाहत्यांचे खूप खूप आभार. तुमचे प्रेम आणि आपुलकी अमूल्य आहे,’ अशा कॅप्शनसह त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये युवराजचे चाहते आणि कुटुंबीय त्याची कारकीर्द आणि निवृत्तीनंतरच्या आयुष्याविषयी बोलताना दिसत आहेत. चाहत्यांनी युवराजने क्रिकेटच्या मैदानावर केलेल्या संस्मरणीय खेळीचा उल्लेख केला. तर, त्याची आई आणि पत्नीने तो सध्या काय करतो याबाबत सांगितले आहे.
हेही वाचा – VIDEO: याला म्हणतात नशीब! चारवेळा प्रयत्न करूनही फलंदाजाला धावबाद करण्यात अपयश
युवराजची आई शबनम सिंगने सांगितले, “युवराज आजकाल गोल्फ खेळण्यात फारच व्यस्त झाला आहे. त्यामुळे जवळपास दोन महिन्यांपासून त्याची आणि माझी भेटही झालेली नाही.” त्या असेही म्हणाल्या की, क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराजने गोल्फशी लग्न केले आहे. इतका तो त्या खेळामध्ये व्यस्त झाला आहे.