मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २०० व्या सामन्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केल्यानंतर जगभरातील क्रिकेटप्रेमी आणि माजी क्रिकेटपटूंनी गुरुवारी हळहळ व्यक्त केली. कसोटी सामन्यांमध्ये मैदानावर सचिन नसण्याच्या कल्पनेने रितेपणाची जाणीव झाल्याचे भारताचा महान माजी क्रिकेटपटू सुनील गावसकरने सांगितले.
सचिनची २००व्या कसोटीनंतर निवृत्ती
सुनील गावसकर म्हणाला, सचिनच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे भारतीय कसोटी संघामध्ये मोठी पोकळी निर्माण झालीये. ती भरून काढणे सहजपणे शक्य नाही. लक्ष्मण, गांगुली आणि द्रविड यांच्या निवृत्तीमुळे काय झाले, हे सगळ्यांनी बघितलेच आहे. फलंदाजीमध्ये मधल्या फळीतील पोकळी भरून येण्यासाठी वेळ लागेल. फलंदाजीमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळणे हे आव्हानात्मकच आहे. जो कोणी चौथ्या क्रमांकावर खेळायला येतो, त्याच्याकडून खूप अपेक्षा असतात. त्यालाही खूप दबावाखाली खेळावे लागते. सचिनला जेव्हा पहिल्यांदा सराव करताना पाहिले होते, त्यावेळीच त्याच्या फलंदाजीतील ताकद माझ्या लक्षात आली होती, असेही गावसकर म्हणाले.
वेस्ट इंडिज दौरा सुरू होण्यापूर्वी निवृत्तीची घोषणा करून सचिनने योग्य निर्णय घेतला असल्याचे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने म्हटले आहे. सचिनच्या क्रिकेट कारकीर्दीतील शेवटचे दोन कसोटी सामने बघण्यासाठी क्रीडारसिकांनी आवर्जून यावे, असे आवाहन त्याने केले. कोलकाता किंवा मुंबई हे सामने कुठेही होवोत, महान क्रिकेटपटूला निरोप देण्यासाठी सर्वांनी हे सामने बघावेत, असे त्याने म्हटले आहे.
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याच्या सचिनच्या निर्णयाचा आपण आदर केला पाहिजे, असे सांगून माजी क्रिकेटपटू मोहंमद अझरुद्दीन म्हणाला, सचिनच्या खेळण्यामुळे आपल्या सगळ्यांना कायमच आनंद दिला आणि देशाबद्दलचा अभिमान वाढवला. गुणवत्ता अनेक क्रीडापटूंकडे असते. मात्र, सचिनकडे गुणवत्तेसोबतच ‘पॅशन’ही आहे, हेच त्याच्यातील वेगळेपण आहे.
भारतीय तसेच जागतिक क्रिकेटसाठी हा अत्यंत दुःखद दिवस असल्याची भावना श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याने व्यक्त केली. भारतीय संघामध्ये सचिन दिसणार नाही. सचिनला बाद करता यावे, असे कायमच आम्हाला वाटायचे. प्रतिस्पर्धी संघातील प्रत्येक गोलंदाजाला सचिनला बाद करण्याची इच्छा असायची. मात्र, बरेच वेळा मैदानावर सचिनच गोलंदाजांविरोधात जिंकायचा. तो खऱंच महान क्रिकेटपटू आहे, असेही मुरलीधरन म्हणाला.
कसोटीतून निवृत्ती स्वीकारण्याचा सचिनचा निर्णय आपल्यासाठी धक्का होता, असे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर म्हणाले. सचिन हा देशातील प्रत्येक क्रीडापटूसाठी आदर्श असल्याचे सांगून ते म्हणाले, तो खरंच महान क्रिकेटपटू आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेरही त्याचे वागणे हे सर्वांसाठी आदर्शच आहे. क्रिकेटच्या इतिहासात सचिनने अनेक विक्रम प्रस्थापित केले असून, उत्कृष्ट कामगिरी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader