मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे एक असे नाव आहे की, ज्याने देशाच्या सीमा ओलांडल्या आणि तो क्रिकेटचा राजदूत ठरला. त्याच्या प्रेमात आजी-माजी भारतीय क्रिकेटपटूंबरोबरच प्रतिस्पर्धी खेळाडूही आहेत आणि याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला. ‘इंडिया टुडे’ साप्ताहिकाने आयोजित केलेल्या ‘सलाम सचिन’ या कार्यक्रमात साऱ्या मान्यवरांनी सचिनवर ‘बोलंदाजी’ करताना त्याला कुर्निसात केला.
सचिनचा भाऊ अजित तेंडुलकर म्हणाला की, ‘‘भारताकडून खेळायचे सचिनचे स्वप्न होते, पण सचिनचे क्रिकेट आमच्या कुटुंबीयांचे स्वप्न होते. साहित्य सहवासमध्ये खेळताना त्याच्यामधील गुणवत्ता हेरून त्याला आचरेकरसरांकडे नेले आणि त्यांनी त्याला पैलू पाडले. सचिनने चेन्नईमधील साकारलेली खेळी माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. या सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, पण सामना पराभूत झाल्याने तो ‘ड्रेसिंग रूम’मध्ये रडत होता. आता काही दिवसांनी सचिन मैदानात नसेल, त्यानंतर त्याच्यावर चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे नसेल, समोर गोलंदाज नसेल, त्याला धावा करता येणार नाहीत, चौकार-षटकार खेचता येणार नाहीत, प्रसारमाध्यमांची टीका नसेल.’’
भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ याने सांगितले की, ‘‘सचिनपुढे गोलंदाजी करणे, हे नेहमीच आव्हानात्मक होते. देदीप्यमान कामगिरीच्या जोरावर सचिनने त्याचा दर्जा बनवला. १९९२च्या पर्थमधील शतकानंतर सचिनच्या खेळात आमूलाग्र बदल झाला. जेव्हा सचिनबरोबर फलंदाजी करण्याचा योग आला, तेव्हा त्याचे सहकार्य कायम असायचे. गोलंदाज आता कसा चेंडू टाकणार, याचे गणित त्याच्या डोक्यात असायचे. १९९६च्या विश्वचषकात उपांत्य फेरीत पराभूत झाल्यावर संघातील ४-५ खेळाडू रडत होते, पण सचिन रडत नव्हता. त्याबद्दल मी विचारल्यावर तो म्हणाला की, या पराभवाने जग संपलेले नाही, अजून बरेच क्रिकेट बाकी आहे.’’
भारतीय संघातील सचिनचा सहकारी सुरेश रैना म्हणाला की, ‘‘पदार्पणाच्या सामन्यात सचिन माझ्याबरोबर खेळत होता. त्या वेळी मी प्रचंड दडपणाखाली होतो. त्या वेळी त्याने मला आत्मविश्वास दिला, प्रत्येक वेळी मार्गदर्शन केले आणि माझ्यावरचे दडपण हलके केले. जेव्हा संघ पाकिस्तानविरुद्ध खेळतो तेव्हा सचिन २०० टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करतो. विश्वचषक जिंकणे हा त्याच्यासाठी भावुक आणि हळवा क्षण होता. तो आमच्यासाठी प्रेरणास्रोत आहे.’’
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूसने आठवणींना उजाळा देताना सांगितले की, ‘‘सचिनचे चेन्नईतील पाकिस्तानविरुद्धचे शतक मला खास वाटते, कारण त्या वेळी त्याची पाठ दुखत होती. खेळपट्टी गोलंदाजीला अनुकूल होती आणि साकलेन मुश्ताक जबरदस्त फॉर्मात होता. त्या वेळी ‘शेर का बच्चा’ सचिन दमदार खेळला आणि त्याने शतक झळकावले होते.’’
भारताची महिला टेनिसपटू सानिया मिर्झा म्हणाली, ‘‘सचिन हा खेळाचा आदर्श राजदूत आहे. महान खेळाडू कसा असावा, हे सचिनकडे पाहिल्यावर कळते. २४ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये तो कधीही वादांमध्ये अडकला नाही. निवृत्तीनंतर त्याने खेळाचे प्रशासन सांभाळावे.’’
सचिन क्रिकेटसाठीच जन्मला आहे, असे भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘सचिन क्रिकेटसाठीच जन्मला, त्याच्यासारखा खेळाडू युगात एखादाच होतो. चुका सुधारण्यासाठी विद्यार्थी म्हणून सचिन बऱ्याचदा भेटला. मैदानावरील आणि बाहेरची शिस्त त्याच्याकडून शिकायला हवी. सचिन आमच्या काळात असता तरीही यशस्वी झाला असता, कारण तो एक महान फलंदाज आहे.’’
..तर भारतीय मला सोडणार नाहीत -अख्तर
लखनौमध्ये रात्रीचे जेवण झाल्यावर आम्ही भारतीय खेळाडूंबरोबर फिरायला बाहेर पडलो होतो. त्या वेळी मी सचिनला उचलण्याचा प्रयत्न केला आणि सचिन घसरला. त्या वेळी मी घाबरलो आणि म्हणालो, हा नाद मी सोडून देतो, कारण तुला जर काही झाले तर भारतीय मला सोडणार नाहीत, असे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने सांगितले.