रिअल माद्रिदच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपला झंझावात कायम राखत गुरुवारी ला लीगा फुटबॉल स्पध्रेतील राया व्ॉलेकानो संघाविरुद्धच्या लढतीत ३००व्या गोलची नोंद केली. माद्रिदने ही लढत २-० अशी जिंकून गुणतालिकेत आगेकूच केली आहे.
तत्पूर्वी, झालेल्या लढतीत बार्सिलोनाने लिओनेल मेस्सी आणि लुइस सुआरेझ यांच्या बळावर अल्मेरिया संघाचा ४-० असा फडशा पाडत ७ गुणांची आघाडी घेतली होती, परंतु माद्रिदच्या या विजयाने ही आघाडी ३ गुणांनी कमी झाली आहे. त्यामुळे अव्वल स्थान टिकवण्याचे बार्सिलोनासमोर आव्हान आहे. अल्मेरियाविरुद्धच्या लढतीत पहिला गोल नोंदवण्यासाठी बार्सिलोनाला अर्धा तास लागला. ३३व्या मिनिटाला मेस्सीने गोल करून बार्सिलोनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यंदाच्या हंगामातील मेस्सीचा हा ४४वा गोल होता. मध्यंतरापर्यंत बार्सिलोनाकडे आघाडी कायम होती. ५५व्या मिनिटाला सुआरेझने दुसरा गोल केला. त्यात ७५व्या मिनिटाला मार्क बॅरत्राने भर टाकली आणि ही आघाडी ३-० अशी मजबूत केली. अखेरच्या क्षणाला सुआरेझने आणखी एक गोल नोंदवून बार्सिलोनाला ४-० असा विजय मिळवून दिला.
दुसऱ्या लढतीत माद्रिदला विजयासाठी संघर्ष करावा लागला. मध्यंतरापर्यंत रायो संघाने वर्चस्व गाजवत माद्रिदला हतबल केले होते. मात्र, मध्यंतरानंतर रोनाल्डो आणि जेम्स रॉड्रिग्ज यांनी कोंडी फोडली आणि माद्रिदला २-० असा विजय मिळवून दिला.
६८व्या मिनिटाला माद्रिदच्या डॅनिएल कार्वाजलने प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना चकवत रोनाल्डोकडे चेंडू पास केला आणि रोनाल्डोने त्याचे गोलमध्ये रूपांतर करून माद्रिदला १-० अशी आघाडी मिळवून दिली. रोनाल्डोने या गोलसह ३०० गोल चा विक्रमही केला.
७३व्या मिनिटाला रोनाल्डोच्या पासवर रॉड्रिग्जने गोल करून सामन्यावरील पकड आणखी मजबूत केली आणि अखेपर्यंत ती कायम राखत माद्रिदचा विजय पक्का केला.
३००
रिअल माद्रिदकडून खेळताना रोनाल्डोने २८८ लढतीत ३०० गोल करण्याचा विक्रम केला.
३२३
माद्रिदकडून सर्वाधिक ३२३ गोल करण्याचा विक्रम स्पेनच्या रॉल गोंझालेज याच्या नावावर आहे. त्यापाठोपाठ अल्फ्रेडो डी स्टेफानो (३०७) याचे नाव येते.

Story img Loader