गोलक्षेत्रात उभा असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो आपल्या पायाने मैदानावरील गवत दाबत होता. फ्री-किक किंवा पेनल्टी घेताना त्याचे पाय एकमेकांपासून वेगळे झाले. कॉर्नरच्या वेळी तर त्याची नजर ‘पॅनोरमा’ फोटो काढल्यासारखी फिरत होती. कॉर्नरवर फटका लगावणारा तसेच कोण कुठे उभे आहे आणि वातावरण, हे सर्व काही तो डोळ्यांत सामावून घेत होता. कॉर्नरवरून चेंडू लगावल्यानंतर त्याची नजर चेंडूवर खिळली होती. डाव्या बाजूला धावत जाऊन चेंडू छातीवर झेलून नंतर त्याला गोलजाळ्याची दिशा दाखवली होती. ऐतिहासिक गोल म्हणून त्याची नोंद झाली होती.
रोनाल्डो इतका महान खेळाडू कसा, हा प्रश्न गेल्या वर्षी इंग्लंडमधील काही शास्त्रज्ञांना सतावत होता. याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी माद्रिदमध्ये प्रयोगशाळा स्थापन केली. ही प्रयोगशाळा होती बरेचसे फुटबॉल क्लब असलेल्या माद्रिदमध्ये. न्यायवैद्यक पद्धतीने रोनाल्डोच्या हालचालींचा अभ्यास करण्यात आला. रोनाल्डोने केलेले सर्वोत्तम गोल तपासण्यात आले. प्रत्येक गोलवेळी प्रयोगशाळेमध्ये दिवे बंद करण्यात येत होते. या चाचणीचा निकाल कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचला असेलही. ‘‘रोनाल्डोचे मैदानावरील निरीक्षण अभूतपूर्व असते. तो एकाच वेळी फक्त चेंडूवर लक्ष ठेवून नसतो. त्याचे मन, बुद्धी हे प्रत्येक क्षणाचा हिशोब करत असते. शारीरिक हालचाली, वेग, अंतर, ध्वनी, स्विंग, स्पर्श, वातावरण सर्व काही. एक अंध व्यक्ती फलंदाजी करताना करतो तसे,’’ त्यापैकीच एक शास्त्रज्ञ सांगत होता.
या चाचणीचा निकाल जगजाहीर झाला आहे. एका सामान्य व्यावसायिक फुटबॉलपटूपेक्षा रोनाल्डो अद्वितीय आहे. दैवी देणगी लाभलेला रोनाल्डो गोल करण्यासाठी शक्य परिस्थिती नसतानाही आपल्या कल्पकतेने तो अशा प्रकारे गोल करतो की पाहणारे फक्त तोंडात बोटे घालतात. आता विश्वचषक उंचावण्यासाठी पोर्तुगालच्या या कर्णधाराकडून संपूर्ण देशवासीयांना मोठय़ा अपेक्षा आहेत. युसेबियो यांच्यानंतर पोर्तुगालवासीयांच्या अपेक्षांचे ओझे उचलले आहे ते रोनाल्डोने. पोर्तुगालचे माजी फुटबॉलपटू युसेबियो यांनी स्वकर्तृत्वावर आपल्या संघाला इंग्लंडमधील १९६६च्या फिफा विश्वचषकात तिसऱ्या स्थानावर मजल मारून दिली होती. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत रोनाल्डोने पोर्तुगालला २००४ युरो चषकाची अंतिम फेरी आणि २००६ फिफा विश्वचषकाची उपान्त्य फेरी गाठून दिली होती. आता सलग तिसऱ्या विश्वचषकात पोर्तुगालची जर्सी घालून रोनाल्डो मैदानात खेळताना दिसत आहे. ‘‘रोनाल्डोने अधिकाधिक गोल करण्यासाठी त्याला चांगला संघ मिळायला हवा. रिअल माद्रिदकडून खेळताना तो गोल करण्याच्या संधी निर्माण करत होता किंवा दुसऱ्याने दिलेल्या संधीवर गोल करत होता. पण पोर्तुगालकडून खेळताना या दोन्ही गोष्टी त्याला एकटय़ालाच कराव्या लागतात,’’ काही दिवसांपूर्वीच अमेरिकेविरुद्धच्या सामन्यासाठी दाखल झालेला पोर्तुगालचा जोआओ अल्बेटरे सांगत होता.
फिफा विश्वचषकाच्या पात्रता फेरीत रोनाल्डोच्या आविष्कारामुळेच पोर्तुगाल संघ ब्राझीलचे तिकीट मिळवू शकला. झ्लटान इब्राहिमोव्हिचच्या स्वीडन संघाविरुद्ध रोनाल्डोने हॅट्ट्रिकसह चार गोल लगावले. ‘वन मॅन आर्मी’ रोनाल्डोच्या कामगिरीमुळे संघातील अन्य २२ जणांना ब्राझीलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. रोनाल्डोवर भलेही टीका होत असेल. पण या मोसमात रिअल माद्रिदला कोपा डेल रे आणि चॅम्पियन्स लीगचे जेतेपद मिळवून देताना रोनाल्डोने तब्बल ६७ गोल लगावले आहेत. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा बलॉन डी’ऑर पुरस्कार मिळवणारा रोनाल्डो मात्र जर्मनीविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात काहीही करू शकला नाही. रोनाल्डो आणि अन्य नऊ जणांनी (पेपेला लाल कार्ड दाखवण्यात आले) पोर्तुगालवासीयांची निराशा केली. चार गोल स्वीकारणाऱ्या पोर्तुगालने जर्मनीच्या थॉमस म्युलरला हॅट्ट्रिक झळकावण्याची संधी दिली. रोनाल्डो स्वत:च्या बळावर कर्णधार, गोल निर्माण करणारा आणि चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवणारा अशा अनेक भूमिका निभावत होता. स्वत:च हे सर्व काही करताना साहजिकच अपयश त्याच्या वाटय़ाला आले.
सामना संपल्यानंतर मात्र रोनाल्डोला राग अनावर झाला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू तरळू लागले होते. रविवारी होणाऱ्या सामन्यासाठी अमेरिकेचे प्रशिक्षक जर्गेन क्लिन्समेन यांनी रोनाल्डोचा हा कच्चा दुवा अचूक हेरला आहे. ‘‘बलॉन डी’ऑर पुरस्कारासाठी योग्य नसलेला रोनाल्डो भावुक होऊन का रडू लागला, हेच मला समजले नाही. पण आता आणखी एका खडतर लढतीला त्याला सामोरे जावे लागणार आहे,’’ क्लिन्समेन म्हणतात. रोनाल्डोला पुन्हा दुखापतीचा त्रास जाणवू लागला आहे. पण अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात तो खेळणार असल्यामुळे डा’मार्कस बेसलेसमोरील अडचणी वाढल्या आहेत. ‘‘रोनाल्डो हा जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे, हे सर्वानाच माहीत आहे. एक-दोन अतिरिक्त जणही त्याला रोखू शकत नाहीत,’’ असे अमेरिकेचा भरवशाचा फुटबॉलपटू बेसले सांगत होता. आता अमेरिकेविरुद्ध रोनाल्डो कोणता आविष्कार घडवतो, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Story img Loader