इंग्लंडच्या अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठी धडपड
सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या आणि सध्या चांगल्या फॉर्मात असलेल्या हेरी केन आणि जेमी व्हॅर्डी यांच्या उपस्थितीत इंग्लंडचा कर्णधार वेन रुनी याचे युरो चषक स्पध्रेसाठीच्या अंतिम अकरा जणांमधील स्थान धोक्यात आले आहे. मात्र, मँचेस्टर युनायटेडचा कर्णधार रुनी इंग्लंडसाठी अजूनही महत्त्वाची भूमिका पार पाडण्यासाठी सक्षम आहे, असे मत युनायटेड क्लबमधील माजी सहकारी ख्रिस्तियानो रोनाल्डोने व्यक्त केले. ‘रुनी अद्वितीय आहे आणि राष्ट्रीय संघासाठी तो अजूनही महत्त्वाची कामगिरी करू शकतो,’ असे रोनाल्डोने स्पष्ट केले.
मँचेस्टर युनायटेडसाठी अनेक वष्रे एकत्र खेळणाऱ्या रोनाल्डोने मात्र, इंग्लंडविरुद्ध खेळताना भावनिक होत असल्याचे सांगितले. २००६च्या फिफा विश्वचषक स्पध्रेत पोर्तुगालने ३-० अशा फरकाने इंग्लंडवर विजय मिळवताना उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तो म्हणाला, ‘रुनी आणि इतर गोष्टींमुळे इंग्लंडविरुद्धचा सामना हा माझ्यासाठी भावनिक आहे. रुनी आता कर्णधार आहे आणि माझ्यासाठी हे आश्चर्यकारक नाही. इंग्लंडचा तो प्रमुख खेळाडू आहे, याच्याशी सर्वच सहमत आहेत आणि त्याच्यात नेतृत्वकौशल्य आहे. डेव्हिड बेकहॅम आणि जॉन टेरी यांच्यानंतर रुनीसाठी हीच योग्य भूमिका आहे.’
इंग्लंडला ‘ब’ गटात रशिया, वेल्स आणि स्लोव्हाकिया यांच्याशी, तर पोर्तुगालला ‘फ’ गटात आईसलँड, ऑस्ट्रिया आणि हंगेरी यांच्याशी सामना करायचा आहे. रॉय हॉगसन यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंड संघ फ्रान्सला आव्हान देऊ शकतो, असा विश्वास रोनाल्डोने व्यक्त केला. इंग्लिश प्रीमिअर लीगच्या २०१५-१६च्या हंगामात केनने २५ गोलसह ‘गोल्डन बूट’चा पुरस्कार पटकावला, तर व्हॅर्डीने २४ गोल करून लिस्टर सिटीच्या पहिल्या जेतेपदात सिंहाचा वाटा उचलला. ‘इंग्लंडचे काही सामने मी पाहिले आणि ते पाहताना आनंद झाला. यंदा त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे,’ असेही रोनाल्डो म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा