पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने फुटबॉल विश्वचषकाच्या मध्यात रियाल माद्रिदला रामराम करत जुवेंटस क्लबमध्ये प्रवेश केला. क्लब फुटबॉलमध्ये रियाल माद्रिदकडून त्याला प्रचंड प्रेम आणि आदर मिळाला. रोनाल्डोनेही अप्रतिम खेळ करत रियल माद्रिदला अनेक स्पर्धांचे विजेतेपद मिळवून दिले. मात्र गेल्या महिन्यात त्याने जुवेन्टस क्लबशी करार केला आणि नुकतीच त्याने जुवेंटसकडून खेळताना केवळ ८व्या मिनिटाला गोल केला. जुवेंटस बी संघाविरुद्ध खेळताना त्याने हा गोल केला.

एका मैत्रीपूर्ण सामन्यादरम्यान हा गोल करण्यात आला. जुलै महिन्यात फेडेरिको बर्नार्डेश्ची याच्या बदल्यात रोनाल्डोची अदलाबदली करण्यात आली होती. रोनाल्डोसाठी युवेंटस क्लबने ११७ मिलियन डॉलर्स इतकी रक्कम मोजली. २००९ साली रोनाल्डो रियाल माद्रिद संघात दाखल झाला होता. त्यावेळी तो जगातला सगळ्यात महागडा खेळाडू ठरला होता. ३३ वर्षीय रोनाल्डोने गेल्या नऊ वर्षात रियाल माद्रिदसाठी ४५० गोल झळकावण्याचा विक्रम रचला. तसेच रियाल माद्रिदसाठी त्याने ४ युएफा चॅम्पियन्स लीग, ३ क्लब वर्ल्ड कप, २ ला लीगा, २ कोपा डेल रे, २ स्पॅनिश सुपर कप आणि २ युएफा सुपर कप जिंकण्याचा पराक्रम गाजवला. गेल्या ९ वर्षात रोनाल्डोने चार वेळा बॅलन डीओर पुरस्कार जिंकला आहे.

Story img Loader