ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दिमाखदार खेळाच्या जोरावर रिअल माद्रिदने ला लिगा फुटबॉल स्पर्धेत गेटाफेवर ४-० अशी मात केली. मात्र रिअलच्या ताफ्यातील कोटय़धीश गॅरेथ बॅले दुखापतग्रस्त झाल्याने रिअलच्या विजयाला गालबोट लागले.
सामना सुरू होण्याच्या काही मिनिटांआधी बॅलेला रिअलच्या संघातून वगळण्यात आले. सराव करताना बॅलेच्या पायाला दुखापत झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. सोमवारी बॅलेच्या चाचण्या होणार आहेत. मात्र ही दुखापत गंभीर नसून, केवळ खबरदारीचा उपाय म्हणून बॅलेला विश्रांती दिल्याचे रिअल व्यवस्थापनाने स्पष्ट केले.  
बॅले खेळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे रिअलला आयत्या वेळी संघात बदल करावा लागला. सामना सुरू होण्यापूर्वी अवघी काही मिनिटे झालेल्या बदलाचा खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम झाला. गेटाफेच्या लॅफिटाने पाचव्याच मिनिटाला गोल करत रिअलवर दडपण आणले. पेपेने दोन टप्पे पडून समोर आलेल्या चेंडूवर शिताफीने गोल करत रिअलचे खाते उघडले. रोनाल्डोने ३३व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. यानंतर रोनाल्डोने फ्रान्सिस्को इस्को अलारकॉनला सुरेख पास दिला. अलारकॉनने गोल करत रिअलची आघाडी भक्कम केली. अतिरिक्त वेळेत रोनाल्डोने आणखी एक गोल करत रिअलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
रोनाल्डोने रिअल माद्रिदसाठी खेळताना २०७ आणि २०८वा गोल केला. या दोन गोलांसह रोनाल्डोने ह्य़ुगो सँचेझला मागे टाकले. रिअलसाठी सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. रॉल गोन्झालेझच्या नावावर सर्वाधिक ३२३ गोल आहेत. रिअलसाठी खेळताना रोनाल्डोने शेवटच्या चार सामन्यात सात गोल केले आहेत.
रिअल माद्रिदचा संघ पाचव्या फेरीअखेर अपराजित असून, गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहेत. बार्सिलोना आणि अ‍ॅटलेटिको माद्रिद आघाडीवर आहेत.
अन्य लढतींमध्ये व्हिलारिअल आणि सेल्टा व्हिगो यांच्यातील लढत बरोबरीत सुटली. रिअल बेटिस आणि ग्रॅनडा यांच्यादरम्यानची लढतही गोलशून्य बरोबरीतच संपली. दरम्यान व्हॅलेन्सिआने सेव्हिलावर ३-१ असा विजय मिळवत पराभवाची मालिका खंडित केली.
ब्राझिलच्या जोनासने ३२व्या आणि ७३व्या मिनिटाला गोल केले. सेव्हिलातर्फे ५२व्या मिनिटाला केव्हिन गेमाइरोने गोल केला. मात्र बदली खेळाडू म्हणून आलेल्या व्हिक्टर रुईझने ८२व्या मिनिटाला गोल करत व्हॅलेन्सिआच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
इंटर मिलानने उडवला सॉस्युलोचा धुव्वा
रोम :  इंटर मिलानने सीरी ए स्पर्धेत सॉस्युलोचा ७-० असा धुव्वा उडवला.  इंटर मिलानतर्फे रॉड्रिगो पालासिओ, सापहीर तैदर, राफले प्युसिनो, रिकाडरे गॅब्रियल अल्वारेझ, इस्टेबान माटिअस कमबिसो यांनी प्रत्येकी एक गोल केला. दिएगो अल्बटरे मिलिटोने दोन गोल केले. गतविजेता ज्युवेन्टस संघाने संघर्षपूर्ण लढतीत हेलास वेरोनावर २-१ अशी मात केली. कालरेस तेवेझ आणि फर्नाडो लोरेन्टो यांनी प्रत्येकी एक गोल केला. रोमाने लेझिओला २-० असे नमवले. नापोलीने एसी मिलानवर २-१ असा विजय मिळवला.