आयपीएल २०२१ स्पर्धा नुकतीच पार पडली असून जेतेपदावर चेन्नई सुपर किंग्सने नाव कोरलं आहे. यानंतर आता आयपीएल २०२२ या स्पर्धेचे वेध लागले आहेत. या स्पर्धेसाठी दोन नव्या संघांचा समावेश केला जाणार आहे. यासाठी फुटबॉलमध्ये प्रसिद्ध असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या मॅनचेस्टर युनाइटेडनं रुची दाखवली आहे. मॅनचेस्टर युनाइटेडचे मालक ग्लेजर कुटुंबीयांनी नवी फ्रेंचाइसी विकत घेण्यासाठी पुढाकार घेतल्याचं बोललं जात आहे.

ग्लेजर कुटुंबीयांनी एका खासगी इक्विटी कंपनीच्या माध्यमातून आयपीएल संघ बनवण्याचे दस्ताऐवज विकत घेतले आहेत, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. कंपनीनं आयपीएल संघ तयार करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. बीसीसीआयनेही नव्या संघांच्या निविदेची शेवटची तारीख वाढवून २० ऑक्टोबर केली होती. निविदा जाहीर करताना बीसीसीआयने आपली नियमावली स्पष्ट केली होती. संघ मालकाची संपत्ती २५०० कोटी रुपये किंवा कंपनीची उलाढाला ३ हजार कोटी रुपये असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बीसीसीआयने नियमात विदेशी कंपन्यांना संघ खरेदी करण्याची मंजुरी दिली आहे. जर विदेशी कंपनीला निविदा मिळाली तर त्यांना भारतात कंपनी प्रस्थापित करावी लागेल. नवी टीम खरेदी करण्याच्या शर्यतीत अदाणी ग्रुप, टोरेंट फार्मा, ऑरोबिंदो फार्मा, आरपी संजीव गोयंका ग्रुप, हिंदुस्तान टाइम्स मीडिया, जिंदाल स्टील, रॉनी स्क्रूवाला आणि तीन खासगी इक्विटीशी संबंधित लोक सहभागी आहेत.

अहमदाबाद, लखनौ, गुवाहाटी, कटक, इंदौर आणि धर्मशाळासारख्या शहरानुसार नावे पुढे आली आहेत. यात सर्वात आघाडीवर अहमदाबादचं नाव पुढे आहे. नुकतंच अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठं स्टेडियम बांधून तयार झालं आहे. २०१० मध्ये जेव्हा दोन नव्या संघांचा समावेश झाला होता. तेव्हा अहमदाबादचं नाव आघाडीवर होतं. मात्र पुणे आणि कोच्चीने बाजी मारली होती.

Story img Loader