दुखापतग्रस्त वेळेत ख्रिस्तियानो रोनाल्डो याने पेनल्टीवर केलेल्या गोलच्या बळावर रिअल माद्रिदने एल्चे संघावर २-१ असा विजय मिळवला. या विजयामुळे रिअल माद्रिदने स्पॅनिश लीग स्पर्धेच्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली असून, ते अव्वल स्थानावरील बार्सिलोनापेक्षा फक्त दोन गुणांनी मागे आहेत.
यजमान एल्चे संघाने पंच सेसार फर्नाडेझ यांच्या निर्णयांवर नाराजी व्यक्त केली. पहिल्या सत्रात कोरो याला कोपर मारल्याप्रकरणी पंचांनी सर्जीओ रामोसला दुसरे पिवळे कार्ड दाखवले नाही. त्यातच दुखापतग्रस्त वेळेच्या चौथ्या मिनिटाला फर्नाडेझ यांनी दिलेला पेनल्टीचा निर्णयही वादग्रस्त ठरला. या पेनल्टीवर रोनाल्डोने कोणतीही चूक न करता निर्णायक गोल लगावला. त्याआधी ५१व्या मिनिटाला फ्री-किकवर एल्चेच्या बचावपटूंची फळी भेदून गोलरक्षकाला चकवून अप्रतिम गोल लगावला होता. पण रिचमंड बोयाकेने ९१व्या मिनिटाला गोल करून सामन्यातील रंगत वाढवली होती.
दरम्यान, नेयमारच्या स्पॅनिश लीगमधील पहिल्या गोलची नोंद करत बार्सिलोनाला रिअल सोसिएदादवर ४-१ असा दणदणीत विजय मिळवून दिला. पाचव्या मिनिटालाच अ‍ॅलेक्सीस सांचेझच्या क्रॉसवर नेयमारने बार्सिलोनाचे खाते खोलले. तीन मिनिटानंतर लिओनेल मेस्सीने हेडरद्वारे गोल करत बार्सिलोनाला २-० असे आघाडीवर आणले. सर्जिओ बस्केट्सने २३व्या मिनिटाला बार्सिलोनासाठी तिसरा गोल झळकावला. रिअल सोसिएदादच्या अल्बटरे डे ला बेला याने
६४व्या मिनिटाला गोल करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न
केला. पण मेस्सीच्या क्रॉसवर मार्क बार्टराने गोल
करून बार्सिलोनाला विजय मिळवून दिला.
आम्ही सुमार खेळ केला. रोनाल्डोच्या दुसऱ्या सत्रातील गोलनंतर आम्ही खेळावर नियंत्रण ठेवू शकलो नाही. या विजयावर मी समाधानी नाही. माद्रिदकडून यापुढे अधिक चांगल्या खेळाची आवश्यकता आहे.
कालरे अँकलोट्टी, रिअल माद्रिदचे प्रशिक्षक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा