रिअल माद्रिदचा इस्पान्योलवर ६-० असा दणदणीत विजय;
गुणतालिकेतील अव्वल बार्सिलोनापेक्षा चार गुण पिछाडीवर
फ्रान्सचे माजी दिग्गज फुटबॉलपटू झिनेदिन झिदान यांच्या मार्गदर्शनाखाली रिअल माद्रिदचे आक्रमण तीव्र झाल्याची अनुभूती ‘ला लिगा’ फुटबॉल स्पध्रेच्या लढतीत पुन्हा एकदा मिळाली. रविवारी मध्यरात्री इस्टाडिओ सँटीआगो बेर्नाबेऊ स्टेडियमवर झालेल्या लढतीत ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या विक्रमी हॅट्ट्रिकच्या जोरावर माद्रिदने ६-० अशा फरकाने इस्पान्योल क्लबवर दणदणीत विजयाची नोंद केली. ‘ला लिगा’ फुटबॉल स्पध्रेतील रोनाल्डोची ही २९ वी, तर कारकीर्दीतली ३९ वी हॅट्ट्रिक आहे.
गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या बार्सिलोना आणि माद्रिद यांच्यात अवघ्या चार गुणांचे अंतर राहिले आहे. रिअल बेटिज क्लबविरुद्धच्या लढतीत गेल्या आठवडय़ात १-१ अशा बरोबरीत समाधान मानावे लागले होते. त्यामुळे इस्पान्योलविरुद्ध त्यांची कामगिरी कशी होते, याकडे लक्ष लागले होते. पहिल्या सत्रात करिम बेंझेमा (७ मि.) आणि जेम्स रॉड्रिग्ज (१६ मि.) यांनी प्रत्येकी एक, तर रोनाल्डोने (१२ व ४५ मि.) दोन गोल करत माद्रिदला ४-० अशी आघाडी मिळवून दिली होती.
दुसऱ्या सत्रात रोनाल्डोने ८२व्या मिनिटाला हेडरद्वारे गोल करून हॅट्ट्रिक पूर्ण केली. ८६व्या मिनिटाला ऑस्कर डुआर्टेच्या स्वयंगोलने माद्रिदची आघाडी ६-० अशी भक्कम केली. याच आघाडीनिशी विजयही निश्चित केला. ‘‘प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आमचे ध्येय आहे आणि या सत्राची अखेर जेतेपद जिंकून करण्याचा प्रयत्न असेल. क्लबकडून भरपूर अपेक्षा आहेत,’’ असे प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांनी सांगितले.

 

संघ म्हणून आम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे आणि संघाची मानसिकता सध्या सकारात्मक आहे. स्पर्धेपूर्वीचे सत्र क्लबसाठी चांगले नव्हते. आमचा बराचसा वेळ प्रवासात गेला होता. मात्र, झिदान यांनी अनोखे डावपेच आखले आणि त्याच विचाराने आम्ही खेळलो.
– ख्रिस्तियानो रोनाल्डो

 

२९ ला लिगा फुटबॉल स्पध्रेत सर्वाधिक २९ हॅट्ट्रिक नोंदविण्याचा विक्रम ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर आहे. त्यापाठोपाठ बार्सिलोनाचा लिओनेल मेस्सी (२५) याचा क्रमांक येतो.

0५ रोनाल्डोने कारकीर्दीत एकूण ३९ हॅट्ट्रिक नोंदवल्या असून त्यापैकी ५ या परिपूर्ण (डाव्या पायाने, उजव्या पायाने व हेडरद्वारे) आहेत.

३० रोनाल्डोने २०१५-१६ च्या सत्रातील २८ सामन्यांमध्ये एकूण ३० गोल केले आहेत. त्यापैकी आठ गोल हे इस्पान्योलविरुद्ध आहेत.

ख्रिस्तियानो रोनाल्डो

Story img Loader