ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलच्या जोरावर ला लिगा फुटबॉल स्पर्धेत रिअल माद्रिदने सेल्टावर ३-० अशी मात केली. या विजयासह गुणतालिकेत अव्वल बार्सिलोना आणि अ‍ॅटलेटिको माद्रिद यांच्यानंतर रिअल माद्रिदने ४४ गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे.
पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. सेल्टाच्या तुलनेत बलाढय़ संघ असूनही रिअल माद्रिदचे आक्रमण प्रभावी ठरले नाही. मध्यंतरानंतर रिअलचे व्यवस्थापक कालरे अ‍ॅनकलोटी यांनी दुखापतीतून सावरलेल्या गॅरेथ बॅले आणि जेस रॉड्रिग्स यांना संघात समाविष्ट केले. ६७व्या मिनिटाला जेसने दिलेल्या पासवर करिम बेन्झामाने सुरेख गोल करत रिअलचे खाते उघडले.
त्यानंतर ८२व्या मिनिटाला डॅनी कारवजलच्या क्रॉसवर रोनाल्डोने गोल केला. अवघ्या काही मिनिटांत गॅरेथ बॅलेकडून आलेल्या चेंडूला गोलपोस्टची दिशा देत रोनाल्डोने रिअल माद्रिदच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
‘‘पहिल्या सत्रात सेल्टाने आमचे डावपेच हाणून पाडले. आमचा खेळ चांगला झाला नाही. मध्यंतरानंतर मात्र लौकिकाला साजेसा खेळ करण्यात आम्ही यशस्वी ठरलो,’’ असे अ‍ॅनकलोटी यांनी सांगितले.

Story img Loader