पोर्तुगालचा महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आपल्या जन्मभूमीत स्वत:च्या वस्तूंचे संग्रहालय उभारणार आहे. पोर्तुगालची राजधानी मडेरा येथील फुंचाल येथे १५ डिसेंबरला या संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे. आपल्या यशस्वी कारकिर्दीत रोनाल्डोने मिळवलेल्या मौल्यवान वस्तू आणि बक्षिसे या संग्रहालयात पाहायला मिळतील.
मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे रोनाल्डोने सध्या रिअल माद्रिदच्या काही सामन्यांमधून माघार घेतली आहे. दुखापतीतून लवकर बरे होण्यासाठी रिअल माद्रिदचे प्रशिक्षक कार्लो अँकलोट्टी यांनी रोनाल्डोला काही दिवसांची सुट्टीही मंजूर केली आहे. त्यामुळे रोनाल्डो सध्या मडेरा येथील आपल्या घरी विश्रांती घेत असून संग्रहालयाच्या उभारणीत हातभार लावत आहे. मंगळवारी सकाळी रोनाल्डो आपल्या घरातून संग्रहालयात ठेवण्यासाठीच्या वस्तू घेऊन गेला. त्यात २००८मध्ये पटकावलेला जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू पुरस्काराचा करंडक (बलॉन डी’ऑर चषक), युवा असल्यापासून आतापर्यंतचे अनेक टी-शर्ट्स आणि स्मृतिचिन्हांचा समावेश होता.
‘‘हे संग्रहालय म्हणजे रोनाल्डोसाठी दिवास्वप्न असणार आहे. आपल्या जन्मभूमीसाठी काहीतरी देणे लागत असल्यामुळेच आईच्या संकल्पनेतून साकारलेले हे संग्रहालय उभारण्यासाठी तो मेहनत घेत आहे. भविष्यात या संग्रहालयात रोनाल्डोच्या आणखी वस्तू ठेवण्यात येतील,’’ असे रोनाल्डोच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. रोनाल्डो सध्या आपल्या आईसह या संग्रहालयाच्या उद्घाटनाच्या तयारीत व्यग्र आहे. रोनाल्डोने एफसी अँडोरिन्हा या छोटय़ाशा क्लबपासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. वयाच्या १२व्या वर्षी लिस्बनला रवाना झाल्यानंतर तो स्पोर्टिग पोर्तुगालकडून खेळू लागला. वयाच्या १८व्या वर्षी त्याने मँचेस्टर युनायटेडशी करार केला होता. त्यानंतर तो रिअल माद्रिद संघात सामील झाला.

Story img Loader