ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, गॅरेथ बॅले आणि गोलरक्षक मॅन्युएल न्युअल यांच्यात जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूसाठी दिल्या जाणाऱ्या बलॉन डी’ऑर पुरस्कारासाठी चुरस रंगणार आहे.
२३ जणांच्या यादीतून या चौघांची निवड करण्यात आली आहे. नदिन केसलर (जर्मनी), मार्ता (ब्राझील) आणि अ‍ॅबी व्ॉमबॅच (अमेरिका) या तिघींची महिलांच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. बलॉन डी’ऑर पुरस्काराची घोषणा १२ जानेवारीला केली जाणार आहे. फिफाच्या सर्वोत्तम प्रशिक्षकाच्या पुरस्कारासाठी रिअल माद्रिदचे प्रशिक्षक कालरे अँकलोट्टी, जर्मनीचे विश्वचषक विजेते प्रशिक्षक जोकिम लो आणि अ‍ॅटलेटिको माद्रिदचे प्रशिक्षक दिएगो सिमोन यांच्यात चुरस आहे. गेल्या वर्षी बलॉन डी’ऑर पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या रोनाल्डोने गेल्या मोसमात ५१ गोल करताना रिअल माद्रिदला चॅम्पियन्स लीगचे जेतेपद मिळवून दिले होते. २००९ ते २०१२ या कालावधीत सलग चार वेळा हा पुरस्कार पटकावणाऱ्या मेस्सीने गेल्या आठवडय़ात चॅम्पियन्स लीग आणि ला लीगा स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. न्युअरने जर्मनीला ब्राझीलमध्ये रंगलेला विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. तसेच त्याने बायर्न म्युनिकला बुंडेसलीगाचे जेतेपद मिळवून दिले होते.

Story img Loader