मध्य आशियातील अल नासर क्लबशी मोठय़ा रकमेचा करार
एपी, लंडन : आधुनिक फुटबॉलमधील तारांकित खेळाडू पोर्तुगालचा ख्रिस्तिआनो रोनाल्डो नव्या वर्षांत सौदी अरेबियातील अल नासर क्लबकडून खेळणार आहे. फुटबॉल विश्वातील त्यातही मध्य आशियातील ही सर्वात मोठी घटना मानली जाते. अल नासर क्लबने आपल्या क्लबची जर्सी घेतलेल्या रोनाल्डोचे छायाचित्र समाज माध्यमावर टाकून या घडामोडीची माहिती जाहीर केली. रोनाल्डोचा हा करार सर्वात मोठा मानला जात असला, तरी कराराची रक्कम अजूनही गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे.
या नव्या करारामुळे युरोपातील एक आघाडीचा खेळाडू प्रथमच आशियातून खेळताना दिसणार असून, रोनाल्डोचा हा करार २०२५ पर्यंत असेल. रोनाल्डोशी झालेल्या करारामुळे केवळ आमच्या क्लबलाच यश मिळणार नाही, तर स्थानिक लीग आणि देशातील फुटबॉलपटूंना सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल, असे क्लबच्या वतीने सांगण्यात आले आहे.
पाच बॅलन डी’ओर पुरस्काराचा मानकरी ३७ वर्षीय रोनाल्डोचा हा कारकीर्दीमधील अखेरचा करार मानला जात आहे. कराराची नेमकी रक्कम गुलदस्त्यात ठेवण्यात आली असली, तरी प्रसार माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार प्रति वर्षी तब्बल २० कोटी डॉलर (१७ अरब रुपये) इतकी घसघशीत असेल. यामुळे आता रोनाल्डो फुटबॉल विश्वातील सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू ठरेल.
फुटबॉल विश्वातील एका नव्या देशात खेळण्यासाठी आपण उत्सुक आहोत, असे रोनाल्डोने म्हटले आहे. मला जे काही मिळवायचे होते, ते मी युरोपमध्ये खेळताना मिळविले. त्यामुळे आता वेगळा विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच मी आशियात खेळण्याचा निर्णय घेतला असेही रोनाल्डो म्हणाला. कतार विश्वचषक स्पर्धेत रोनाल्डोची कामगिरी निराशाजनक राहिली होती. बाद फेरीत तर त्याला राखीव खेळाडूंत बसविण्यात आले होते.
लंडन, स्पेननंतर आता आशियात
पोर्तुगालच्या या तारांकित खेळाडूने व्यावसायिक कारकीर्दीत इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये मँचेस्टर युनायटेडकडून दोन वेळा आणि एकदा स्पेनमध्ये रेयाल माद्रिदकडून आपले कौशल्य दाखवले आहे. विश्वचषक जेतेपदाचे त्याचे स्वप्न अर्धवट असले, तरी चॅम्पियन्स लीगची विजेतेपदे त्याने अनुभवली आहेत.