युद्धात आणि प्रेमात सारे काही क्षम्य असते, असे म्हटले जाते. पण याच धर्तीवर खेळात जिंकण्यासाठी सारे काही विसरून रणनीती आखली जाते. त्यामुळेच सध्याच्या व्यावसायिक युगात जिंकण्यासाठी खेळभावनेचा विचार न करताही योजना आखली जाते आणि त्यामुळेच खेळातील आनंदाला मुकावे लागते. असाच एक प्रकार गुरुवारी झालेल्या बंगळुरू बुल्स आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यातील सामन्यादरम्यान पाहायला मिळाला. जयपूरने मध्यंतरापर्यंत १७-११ अशी आघाडी घेतली होती आणि त्यानंतर बचावात्मक खेळ करण्याचे त्यांनी ठरवले. जयपूरचा कर्णधार जसवीर सिंगने त्यानंतर अगदी सामना संपेपर्यंत २० निष्फळ चढाया केल्या आणि खेळ निरसवाणा झाला. रणनीतीचा विचार केला तर ती योग्य असेलही, पण त्यामध्ये खेळाचा आत्मा हरवल्याची टीका कबड्डीतील जाणकार आणि चाहत्यांकडून होत आहे.
याबाबत बंगळुरू बुल्स संघाचा कर्णधार मनजित चिल्लर म्हणाला की, ‘‘जसवीरने जे काही केले, तो रणनीतीचा एक भाग होता. सध्याच्या खेळात एवढी आघाडी मिळाल्यावर बचावात्मक खेळ करून सामना जिंकण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे त्याचे काही चुकले, असे मी म्हणणार नाही. आमच्याकडे अशी आघाडी असती तर कदाचित आम्हीदेखील असेच काही करू शकलो असतो.’’
खेळ रंगतदार आणि जलद व्हावा, यासाठी प्रो कबड्डी लीगमध्ये काही नियम या वर्षी बनवले गेले. त्यानुसार कोणत्याही संघाला तीन सलग निष्फळ चढाया करता येत नाहीत. पण कायद्याच्या जशा पळवाटा असतात, तसेच या नियमांचेही झाल्याचे जसवीरच्या या रणनीतीने अधोरेखित होते. जसवीर दोन सलग निष्फळ चढाया करून तिसऱ्या चढाईला अन्य एका खेळाडूला पाठवत होता. या रणनीतीमध्ये अस्सल खेळापेक्षा वेळखाऊपणा अधिक होता.
याबाबत पुणेरी पलटण संघाचे प्रशिक्षक अशोक शिंदे म्हणाले की, ‘‘हा एक रणनीतीचा भाग असला तरी त्यामध्ये खेळ कुठेच दिसत नाही. जसवीरने जे केले ते चुकीचे म्हणता येणार नाही, पण त्यामुळे खेळातला जिवंतपणा हरवून गेला. त्याने या चढायांमध्ये जलदपणा आणला असता तर खेळ कंटाळवाणा झाला नसता.’’
खेळाचा आनंद मिळत नसल्यामुळे प्रेक्षकांनी जसवीरची हुर्योही उडवली. पण विजयासाठी काहीही करायला तयार असलेल्या कठोर जसवीरवर मात्र त्याचा किंचितही परिणाम झाला नाही. याबाबत सध्याच्या फॉर्मात असलेला आणि गुणांची शंभरी गाठणारा दिल्ली दबंगचा काशिलिंग आडके म्हणाला की, ‘‘जसवीर हा फार मोठा खेळाडू आहे. त्याला खेळाची जास्त माहिती आहे. अशा खेळाडूंवर साऱ्यांच्याच नजरा असतात, त्यामुळे त्यांना काही वेळा आपला खेळ लपवावा लागतो. त्यामुळे त्याने असे केले असावे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा