Shahid Afridi has raised questions on Babar’s captaincy in World Cup 2023: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने सध्याचा कर्णधार बाबर आझमच्या कर्णधारपदावर जोरदार टीका केली आहे. चालू विश्वचषकात सलग तीन सामने पराभूत झालेल्या पाकिस्तानी संघाची उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता फारच कमी झाली आहे. पाकिस्तानला अफगाणिस्तानविरुद्धही लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्यानंतर शाहिद आफ्रिदीने बाबरच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
फलंदाजांवर दबाव कसा टाकायचा हे बाबरला माहीत नाही –
आफ्रिदीने म्हटले आहे की, बाबर आझमला आक्रमक क्षेत्र कसे सेट करायचे आणि विरोधी संघाच्या फलंदाजांना कोंडीत कसे पकडायचे? तसेच फलंदाजांवर दबाव कसा आणायचा हे माहित नाही. बाबरने ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून काहीतरी शिकले पाहिजे, असे शाहिद आफ्रिदी म्हणाला. सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणणे हे कर्णधाराचे काम असल्याचे आफ्रिदीने सांगितले. वेगवान गोलंदाज गोलंदाजी करत आहे आणि स्लिपमध्ये कोणीही नाही. जर १२ चेंडूत ४ धावा हव्या असतील तर तुम्ही बॅकवर्ड पॉइंट घेतला आहे. हे सर्व खराब कर्णधारपदात दिसते.
शाहीद आफ्रिदी स्थानिक माध्यमांशी बोलताना म्हणाला, “दबाव टाकणे हे कर्णधाराचे काम आहे. वेगवान गोलंदाज गोलंदाजी करत आहे आणि स्लिप नाही? १२ चेंडूत चार धावांची गरज आहे आणि तुम्ही दबाव टाकण्याऐवजी मागे सरकत आहात. ऑस्ट्रेलियन काय करतात? ते एक किंवा दोन विकेट घेतात आणि नंतर दबाव निर्माण करण्यासाठी त्यांच्या सर्व खेळाडूंना वर्तुळात ठेवतात, जसे त्यांनी पाकिस्तानविरुद्ध केले होते.”
कर्णधारपद हे गुलाबांचा पलंग नाही –
माजी कर्णधार आफ्रिदी पुढे म्हणाला की, “राष्ट्रीय संघाचे कर्णधारपद मिळणे हा सन्मान आहे, पण कर्णधारपद म्हणजे गुलाबांचा पलंग नाही. जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करता तेव्हा तुमची प्रशंसा होते, परंतु जेव्हा तुम्ही खराब कामगिरी करता तेव्हा तुम्हाला दोष दिला जातो. त्यावेळी कर्णधारासह मुख्य प्रशिक्षकालाही दोष दिला जातो.”
बाबर आझमचे कर्णधारपद धोक्यात?
पाकिस्तानमध्ये एकदिवसीय विश्वचषकानंतर बाबर आझमऐवजी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीकडे कर्णधारपद सोपवण्याची चर्चा सुरू असल्याचं वृत्तात म्हटलं जात आहे. आफ्रिदीने त्याच्या नेतृत्वाखाली लाहोर कलंदरला दोनदा विजेतेपद मिळवून दिले आहे. त्यामुळेच त्याचा दावा मजबूत दिसत आहे. तथापि, अद्याप याबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितले गेले नाही. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत संघ किती पुढे जातो हे पाहणे बाकी आहे.