विश्वचषकात तिसऱ्या स्थानासाठी लढत आज; मॉड्रिचच्या कामगिरीवर लक्ष
अल रायन : विश्वविजेतेपदाचे स्वप्न अधुरे राहिले असले, तरी शनिवारी होणारी तिसऱ्या स्थानासाठीची लढत जिंकून विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची विजयी सांगता करण्याचे क्रोएशिया आणि मोरोक्को या संघांचे लक्ष्य असेल. क्रोएशियाचा कर्णधार आणि तारांकित मध्यरक्षक लुका मॉड्रिचचा हा विश्वचषकातील अखेरचा सामना ठरण्याची शक्यता आहे.
क्रोएशिया आणि मोरोक्को या दोनही संघांनी विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. मात्र, उपांत्य फेरीत क्रोएशियाला अर्जेटिनाकडून ०-३ असा, तर मोरोक्कोला फ्रान्सकडून
०-२ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघांना विश्वचषकाच्या जेतेपदापासून वंचित राहावे लागले.
क्रोएशिया आणि मोरोक्को हे संघ यंदा साखळी फेरीत आमनेसामने आले होते. हा सामना गोलशून्य बरोबरीत संपला होता. मात्र, त्यानंतर दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी केली.
गतविश्वचषकात अंतिम फेरीपर्यंतची मजल मारणाऱ्या क्रोएशियाकडून यंदा फार कोणाला अपेक्षा नव्हत्या. मात्र, सांघिक कामगिरीच्या बळावर क्रोएशियाने उपांत्य फेरीचा टप्पा गाठला. अर्जेटिनाविरुद्ध क्रोएशियाला सर्वोत्तम कामगिरी करण्यात अपयश आले. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याचे त्यांचे ध्येय पूर्ण होऊ शकले नाही.
दुसरीकडे, मोरोक्कोसाठी यंदाची विश्वचषक स्पर्धा स्वप्नवत ठरली. जागतिक क्रमवारीत २२व्या स्थानी असलेला मोरोक्कोने साखळी फेरीत क्रोएशियाला गोलशून्य बरोबरीत रोखल्यानंतर जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरील बेल्जियम आणि कॅनडावर मात केली. त्यानंतर उपउपांत्यपूर्व आणि उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोने अनुक्रमे स्पेन आणि पोर्तुगाल या युरोपातील बलाढय़ संघांना पराभवाचा धक्का दिला. उपांत्य फेरी गाठणारा मोरोक्को पहिलाच अरब देश ठरला.
’ वेळ : रात्री ८.३० वा.
’ थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१,
१ एचडी, स्पोर्ट्स १८ खेल, जिओ सिनेमा
सामन्याचे महत्त्व काय?
विश्वचषकातील तिसऱ्या स्थानासाठीचा सामना अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा असल्याचे ‘फिफा’चे म्हणणे आहे. या सामन्याच्या माध्यमातून ‘फिफा’ला महसूल उपलब्ध होतो. तसेच विश्वचषकात तिसरे स्थान मिळवणेही प्रतिष्ठेचे मानले जाते. यंदा तिसरे स्थान मिळवणारा संघ कांस्यपदक आणि २ कोटी ७० लाख डॉलरचे पारितोषिक आपल्या नावे करेल. या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला पदकापासून वंचित राहावे लागले. तसेच या संघाला तिसऱ्या स्थानावरील संघापेक्षा २० लाख डॉलर कमी मिळतील.