David Teeger removed as South Africa captain : पॅलेस्टाईनबरोबर सुरू असलेल्या संघर्षात इस्रायली सैन्याच्या समर्थनार्थ केलेल्या टिप्पण्यांनंतर, डेव्हिड टिगरला विश्वचषकाच्या एक आठवडा आधी दक्षिण आफ्रिकेच्या अंडर-१९ कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिका १९ जानेवारीपासून सुरू होणार्या स्पर्धेपूर्वी तयारी करत आहे. सीएसएने सांगितले की, टीगरला कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा निर्णय सर्व खेळाडू, एसए अंडर-१९ संघ आणि स्वतः डेव्हिड यांच्या हितासाठी घेण्यात आला आहे. तो एक खेळाडू म्हणून संघाबरोबरच राहील आणि योग्य वेळी नवीन कर्णधाराची नियुक्ती केली जाईल.
दक्षिण आफ्रिकेची मोहीम पुढील शुक्रवारी पॉचेफस्ट्रूममध्ये सुरू होईल, जिथे ते वेस्ट इंडिजविरुद्ध सामना खेळतील. त्यानंतर इंग्लंड आणि स्कॉटलंडविरुद्ध सामने होतील. गेल्या नोव्हेंबरमध्ये श्रीलंकेतून हलविण्यात आलेली ही स्पर्धा बेनोनी येथेही खेळली जाईल, जे सेमीफायनल आणि फायनलचे आयोजन करतील. ब्लूमफॉन्टेन आणि किम्बर्ले येथील ठिकाणांवर सीएसएला निदर्शने होण्याची शक्यता वाटत आहे.
सीएसएने म्हटले आहे की, “या स्वरूपाच्या सर्व घटनांप्रमाणेच, सीएसएला विश्वचषकाच्या संदर्भात नियमित सुरक्षा आणि जोखीम अपडेट्स मिळत आहेत. आम्हाला गाझामध्ये स्पर्धेच्या ठिकाणी सुरू असलेल्या युद्ध-संबंधित निदर्शनांबद्दल सूचित केले गेले आहे. आम्हाला असेही सूचित करण्यात आले आहे की ते एसए अंडर-१९ कर्णधार डेव्हिड टीगरच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करू शकतात आणि त्यांच्यामुळे विरोधकांच्या प्रतिस्पर्धी गटांसह संघर्ष किंवा हिंसा देखील होऊ शकते, असा धोका आहे.”
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना केपटाऊनमध्ये खेळला गेला होता. त्याचवेळी इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. अशा स्थितीत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील केपटाऊन कसोटीपूर्वी पॅलेस्टाईन समर्थक गटाने मोठा गोंधळ घातला होता. त्यांनी न्यूलँड्स क्रिकेट स्टेडियमबाहेर इस्रायलविरोधी घोषणा दिल्या आणि यजमान संघाचा अंडर-१९ कर्णधार डेव्हिड टिगरला बडतर्फ करण्याची मागणी केली होती. कारण टिगरने इस्त्रायली लष्कराचे समर्थन करणारे वक्तव्य केले होते.
आंदोलकांच्या एका छोट्या गटाने “वर्णभेदी इस्रायलवर बहिष्कार घाला” आणि “वर्णभेदी इस्रायलचा नाश करा” असे फलक हातात घेतले होते. या आंदोलकांनी स्वतंत्र पॅलेस्टाईनच्या मागणीसाठी घोषणाही दिल्या होत्या. त्याचबरोबर स्टेडियमबाहेर या आंदोलकांनी दक्षिण आफ्रिकेच्या अंडर-१९ कर्णधाराच्या विरोधात घोषणाबाजीही केली होती.
हेही वाचा – IND vs AFG : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
एक आंदोलक म्हणाला होता, ‘डेव्हिड टिगर, तू आमच्या देशाचा कर्णधार होण्याच्या पात्रतेचा नाहीस. टिगरला गेल्या वर्षी २२ ऑक्टोबर रोजी झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात ‘रायझिंग स्टार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, त्यानंतर तो म्हणाला होता, ‘मला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता हो आता मी ‘रायझिंग स्टार’ आहे, पण खरे ‘रायझिंग स्टार्स’ हे इस्रायलमधील तरुण सैनिक आहेत.’